शिरूर तालुक्यात वरुडे येथे बिबट्या जेरबंद...सविंदणे बिबट्याने पाडला शेळी, करडूचा फडशा
शिरूर, प्रतिनिधी
वरुडे येथे वन | विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये अखेर बिबट्या |जेरबंद झाला.वरुडे येथील अनेक ठिकाणी पशुधनांवर बिबट्याने हल्ले केल्याने वन विभागाने नुकताच पांडुरंग मुरकुटे यांच्या शेतामध्ये पिंजरा लावला होता. आज सकाळच्या सुमारास पांडुरंग मुरकुटे यांच्या शेतातील कामगार शेताकडे गेला असता त्याला पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकल्याचे दिसले. याबाबतची माहिती शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांना मिळताच वनरक्षक वंदना चव्हाण, वनमजूर हनुमंत कारकुड आदींनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने बिबट्याला ताब्यात घेतले. यावेळी पांडुरंग मुरकुटे, सुधाकर शेवाळे, यश तांबे, सुमित फंड, विकास चव्हाण, पंडित फंड, तेजस फंड आदी उपस्थित होते, तर वन विभागाने ताब्यात घेतलेल्या बिबट्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्र येथे केली आहे.
सविंदणे बिबट्याने पाडला शेळी, करडूचा फडशा
शिरूर : सविंदणे येथे बिबट्यानेशेळी आणि करडूचा फडशा पाडला. सुरेश ज्ञानेश्वर लंघे यांच्या गोठ्यातील शेळी आणि करडूवर बिबट्याने हल्ला केला. या घटनेमुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे जनावरे आणि माणसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिरूर तालुक्यात यापूर्वीही वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांचे अनेक प्रकार घडले आहेत. अनेकजणांचे बळी त्यामुळे गेले आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये मांडवगण फराटा आणि परिसरात बिबट्याने लहान मुले, शेळ्या आणि कुत्र्यांवर हल्ले केले होते.