आमदार माऊली कटके यांच्या प्रयत्नांमुळे शिरूरकरांचे पाणीटंचाईचे संकट टळले
शिरूर, प्रतिनिधी
शिरूर शहरात गेल्या काही दिवसांपासून दिवसा आड पाणीपुरवठा सुरू झाला होता यामुळे शिरूरकरांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याची गंभीर दखल घेत शिरूरचे आमदार माऊली कटके यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून शिरूर कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी आणले व शिरूरकरांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. आज पासून शिरूर शहराला नियमित पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आमदार माऊली कटके यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि तातडीच्या हालचालींमुळे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
२० मार्चपासून सुरू झालेल्या दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. उन्हाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होऊ नये, म्हणून आमदार माऊली कटके यांनी तत्काळ पाणीपुरवठा विभाग, नगरपरिषद अधिकाऱ्यां सोबत चर्चा केली. त्यानुसार, आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून, आजपासून पूर्ववत दररोज पाणीपुरवठा सुरू होणार आहे.
आमदार कटके यांच्या शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यामुळे शिरूरकरांना दिलासा मिळाला असून, उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू नये यासाठीही पुढील नियोजन करण्यात येत आहे. “शिरूरवासीयांना पाणी टंचाईचा त्रास होऊ देणार नाही. भविष्यातही योग्य नियोजन करून सतत पाणी पुरवठा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार माऊली कटके यांनी सांगितले.
नगरपरिषदेने नागरिकांना जबाबदारीने पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे. पाणी साठवताना दक्षता घ्यावी, गळती टाळावी आणि गरजेपुरतेच पाणी वापरावे, असे प्रशासनाने सांगितले आहे.