ऊसतोड कामगाराच्या कोप्यातून कोल्ह्याच्या पिल्लांची सुटका
( प्रतिनिधी ) कासारी ता. शिरुर येथे तात्पुरते वास्तव्यास आलेल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांनी शेतात आढळून आलेल्या कोल्ह्याची पिल्ले कुत्र्याची पिल्ले समजून घरी आणली मात्र एका नागरिकाच्या सतर्कतेने त्या पिलांची प्राणीमित्रांकडून सुटका करत निसर्गात मुक्त करण्यात आले आहे.
कासारी ता. शिरुर येथे तात्पुरते वास्तव्यास आलेल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांजवळ कोल्ह्याची पिल्ले असल्याचे प्रकाश रासकर यांच्या निदर्शनास आले, त्यांनी याबाबतची माहिती त्यांच्या ओळखीच्या वनरक्षक ऋतुजा भोरडे यांना माहिती दिली, त्यांनतर वनरक्षक ऋतुजा भोरडे, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व शिरुर वनविभाग रेस्क्यू टीमचे शेरखान शेख, अमोल कुसाळकर, शुभम वाघ, प्रकाश रासकर यांनी तातडीने सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता त्या उसतोड कामगारांच्या मुलांनी कुत्रे समजून कोल्ह्याच्या तीन पिल्लांना घरी आणल्याचे समजले, दरम्यान वनरक्षक व प्राणीमित्रांनी त्यांना समज देत कोल्ह्याच्या पिल्लांना ताब्यात घेत ज्या शेतातून मुलांनी पिल्ले आणली त्या शेताचे जवळ नैसर्गिक आदिवासात मुक्त केले.
फोटो खालील ओळ – कासारी ता. शिरुर येथे कुत्र्याची समजून घरी आणलेल्या कोल्ह्याच्या पिल्लांना ताब्यात घेताना प्राणीमित्र.