पुणे महामार्गावर पळवे जवळ झालेल्या अपघात; शिरूर तालुक्यातील आंबळेचे माजी सैनिक जागीच ठार, तीन जण गंभीर जखमी
शिरूर प्रतिनिधी
अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पळवे शिवारात मठ वस्ती नजीक सोमवारी (ता.२४) दुपारी दोन कारची जोरदार धडक झाली. यात शिरूर तालुक्यातील आंबळे येथील माजी सैनिक कैलास बेंद्रे जागीच ठार झाले. कारमधील तीन जण जखमी झाले.
बेंद्रे हे वाळवणे येथे पत्नीसह आपल्या सासूरवाडीस येत होते.
सोमवारी दुपारी अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पळवे खुर्द शिवारात मठ वस्ती नजीक कार (एमएच १२, एसएल ९५) व दुसरी कार (एम.एच. ०२, जीजे २७८५) या दोन कारची जोरदार धडक झाली. यात कैलास आबासाहेब बेंद्रे (वय ४१, रा. आंबळे, ता.शिरूर) यांचा मृत्यू झाला, तर पत्नी अर्चना कैलास बेंद्रे (रा. आंबळे, ता. शिरूर), विजय शिंदे (रा. वाळवणे, ता. पारनेर) व एक महिला (नाव समजू शकले नाही) हे जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच सुपे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, हवालदार अमोल धामणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुपे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपे पोलिस करत आहेत.