शिरूर शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत प्रभू श्री रामलिंग महाराजांच्या महाशिवरात्रीला होत असलेल्या यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली असून २५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी तीन दिवस मुख्य यात्रा असून यात्रेची सुरुवात अखंड हरिनाम सप्ताह सुरू करून होत आहे. तर पालखीचा मान शिरूर शहराला असून यात्रा ही श्री रामलिंग देवस्थान जुने शिरूर येथे रामलिंग देवस्थान विश्वस्त व पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने होणार असल्याची माहिती श्री रामलिंग देवस्थानचे अध्यक्ष उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल व खजिनदार पोपटराव दसगुडे यांनी दिली आहे.
शिरूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर श्री रामलिंग मंदिर असून, या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना प्रभू श्री रामचंद्रांनी केल्याची आख्यायिका आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला या देवस्थानची यात्रा भरते.
दिवंगत उद्योगपती रसिकलाल धारिवाल व तत्कालिन ट्रस्टी यांनी नवसातून या देवस्थानची यात्रा सुरू केली असून, यंदा यात्रोत्सवानिमित्त जुने शिरूर येथील रामलिंग मंदिर व परिसरात रंगरंगोटी केली असून, मंदिराच्या कळसावर रोषणाई केली आहे. मंदिर परिसरात स्वागत कमानींसह उन्हापासून भाविकांच्या संरक्षणासाठी मंडप टाकले आहेत. यात्रेसाठी विविध खेळणी, विविध विक्रेते यांनी आपापली दुकाने थाटण्यात सुरुवात केली आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या यात्रा महोत्सवाची सुरवात पालखीच्या ग्रामप्रदक्षिणेने होते. मंगळवार २५ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता शहरातून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, पालखीच्या स्वागतासाठी अवघे शहर स्वागत कमानी व भगव्या झेंड्यांनी , संपूर्ण पालखी मार्गावर भगव्या पताकांची सजावट केली आहे. पालखी मिरवणुकीसाठी चाळीसगाव, बारामती , जालना, नागपूर येथील ब्रास बॅण्ड पथके, सनई चौघडा तसेच मावळ मुळशी परिसरातून झांज पथकांना निमंत्रित केले आहे. शहर व परिसरातील लेझीम पथक, झांजपथकही मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. महाशिवरात्री या यात्रेच्या मुख्य दिवशी २६ फेब्रुवारी पहाटे शिरूर शहरातून श्री रामलिंग पालखीचे श्री रामलिंग देवस्थान जुने शिरूर येथे प्रस्थान होणार असून तेथे पहाटे शिवलिंगावर महारुद्राभिषेक केला जाणार त्यानंतर यात्रेस सुरुवात होणार दिवसभर शिरूर व पुणे जिल्हा , शिरूर,श्रीगोंदा, पारनेर तालुक्यातून व राज्यातून मोठ्या मोठ्या प्रमाणात रामलिंग भक्त रामलिंगाच्या दर्शनासाठी येणार आहे या दिवशी
विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रात्री शोभेचे दारूकाम, तसेच परिसरातील शाळांतील मुलांच्या सामुहीक नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे.
तर २७ फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण संतोष महाराज कौठाळे महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे त्यानंतर महाप्रसाद होणार .
तर त्याच दिवशी सकाळीच बैलगाड्यांच्या शर्यतींचे आयोजन केले असून, त्यासाठी जुने शिरूर येथील घाटाची दुरुस्ती केली आहे. दोन लाख रुपये, पावणे दोन लाख रुपये, सव्वा लाख रुपये, पाऊण लाख रुपये अशी बक्षिसांची लयलूट बैलगाडा शर्यतीसाठी केली आहे.
श्री रामलिंग देवस्थान ट्रस्ट व यात्रा समितीचे अध्यक्ष प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रा समितीच्या नियोजनाची नुकतीच बैठक झाली, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस पोपटराव दसगुडे, वाल्मीकराव कुरंदळे, गोदाजी घावटे, बलदेवसिंग परदेशी, रावसाहेब घावटे पाटील, बबनराव कर्डिले, नामदेवराव घावटे, जगन्नाथ पाचर्णे आदी उपस्थित होते