शिक्रापुरात दोनच दिवसांत धुमाकूळ : नागरिक भयभीत
शिरूर प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे शनिवारी व रविवारी या दोन दिवसांत तब्बल २१ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यानं त्रासलेल्या ग्रामस्थांनी अखेर या कुत्र्याला मारल्याचे निष्पन्न झाले असून २१ पैकी १२ जणांनी श्वानदंश प्रतिबंधक लस घेतल्याची माहिती सरपंच रमेश गडदे यांनी दिली.
शिक्रापूर येथे दोन दिवसांत महाबळेश्वरनगर, इको ग्राम सोसायटी व तळेगाव रोड परिसरात
दोन पिसाळलेली कुत्रे फिरत असून ती नागरिकांवर हल्ला करीत असल्याची माहिती निष्पन्न झाली. सुरवातीला ही केवळ चर्चा होती. मात्र, रविवारी सकाळी सुमारे २१ जणांना पिसाळलेले कुत्रे चावल्याचे निष्पन्न झाले. यातील १२ जणांनी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्याची माहितीही ग्रामपंचायतीकडे उपलब्ध झाली. कुत्र्याच्या शोधासाठी सकाळपासूनच
पेट पोर्स संस्थेचे कार्यकर्ते व ग्रामपंचायत कर्मचारी गावात फिरत होते. मात्र, इकोग्राम सोसायटी परिसरातील काही नागरिकांनी यातील एक पिसाळलेले कुत्रे मारल्याचे निष्पन्न झाले. दुसरे पिसाळलेले कुत्रे आहे की नाही, याबाबत अद्यापही संभ्रम असून त्याचा शोध सुरु आहे. दरम्यान, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथे (दि.२३) सकाळपासून श्वान दंश झालेले अनेक रुग्ण आल्यानंतर त्यांना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शहाजी कदम यांनी दिली.