पुणे शहर -शिरुर प्रांत कार्यालयातील लाचखोर महिला अव्वल कारकूनाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून अटक

9 Star News
0
पुणे शहर -शिरुर प्रांत कार्यालयातील लाचखोर महिला अव्वल कारकूनाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली
शिरूर प्रतिनिधी 
       शिरूर तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांकडून एक लाख साठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे शहर -शिरुर प्रांत कार्यालयातील लाचखोर महिला अव्वल कारकूनाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.
       सुजाता मनोहर बडदे असे लाच स्वीकारणाऱ्या महिला अव्वल कारकूनाचे नाव आहे.
         त्यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम तानाजी श्रीपती मारणे यांनी लाच स्विकारली होती. त्यामुळे खाजगी इसम मारणे व अव्वल कारकून सुजाता बडदे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.

         तक्रारदार यांची टेमघर धरणामध्ये जागा गेल्याने त्यांना सरकारकडून शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे जमीन व घरांसाठी दोन गुंठे भूखंड दिलेला आहे. त्याचप्रमाणे तक्रारदार यांच्या कुटुंबातील चार व सख्खा भावाच्या कुटुंबातील सदस्यांसाठी चार असे आठ प्रस्ताव प्रांत कार्यालयात प्रलंबित होते. हे प्रस्ताव प्रांतधिकारी यांच्याकडून मंजूर करुन घेण्यासाठी अव्वल कारकून सुजाता बडदे यांनी प्रत्येकी प्रस्तावासाठी ५० हजार रुपये प्रमाणे चार लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
        तडजोडीने प्रति प्रस्ताव ४० हजार रुपये प्रमाणे तीन लाख वीस हजार रुपये ठरले. प्रत्यक्ष प्रांत कार्यालयात त्यातील पहिला हप्ता एक लाख साठ हजार रुपये अव्वल कारकून सुजाता बडदे यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम तानाजी मारणे यांनी स्विकारताच त्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!