गर्भवती महिलांसाठी विशेष ओटीभरण सोहळा मातृत्वाचा सन्मान आणि संस्काराचा वारसा- डॉ. सुनीता पोटे
शिरूर प्रतिनिधी
हळदी कुंकू कार्यक्रम करत असताना गरोदर महिलांनी गर्भावर चांगले संस्कार करण्यासाठी प्रयत्नशील रहावे कारण गर्भसंस्कार म्हणजे केवळ उपचार नव्हे, तर सुसंस्कृत आणि सशक्त पिढी घडवण्याचा एक टप्पा असल्याचे प्रतिपादन राही फाउंडेशनच्या डॉ. सुनिता पोटे यांनी व्यक्त केले.
मीरा नर्सिंग होम येथे राही फाउंडेशनतर्फे हळदीकुंकू व गर्भसंस्कार मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी डॉ सुनिता पोटे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना डॉ पोटे म्हणाल्या कल्याण: मातृत्व हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा टप्पा असतो. भारतीय संस्कृतीत गरोदरपणातील परंपरांना विशेष महत्त्व असून, त्या केवळ रूढी नसून, महिलांसाठी मानसिक आणि शारीरिक उर्जेचा स्रोत ठरतात. याच पार्श्वभूमीवर, राही फाउंडेशनच्या डॉ. सुनीता पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा नर्सिंग होम येथे गर्भवती महिलांसाठी पारंपरिक ओटीभरण व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी गर्भसंस्कार आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात गर्भसंस्कार, योग्य आहार, व्यायाम आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी आवश्यक असलेल्या टिप्सबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. सुनीता पोटे यांनी गरोदरपणात पारंपरिक पद्धतींचे पालन का आवश्यक आहे, हे स्पष्ट करताना सांगितले,
"गर्भसंस्कार म्हणजे केवळ उपचार नव्हे, तर सुसंस्कृत आणि सशक्त पिढी घडवण्याचा एक टप्पा आहे. आधुनिक जीवनशैलीत योग्य आहार, मानसिक स्थिरता आणि नियमित व्यायाम यांचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे पारंपरिक नैसर्गिक पद्धतींचा अवलंब केल्यास गरोदरपण अधिक आनंदी आणि निरोगी होईल."
परंपरागत ओटीभरण सोहळा – साडी, आशीर्वाद आणि सन्मान
पर्यावरण समिती भारत यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात आदर्श माजी सरपंच जिजाताई दुर्गे, मंगलताई कौठाळे, माजी नगरसेविका कविताताई वाटमारे, मनीषाताई साळुंके, माधवी पठारे, सपनाताई बामणोटे तसेच डॉ. सविता सोनवणे मॅडम यांच्या हस्ते गर्भवती महिलांचे पारंपरिक साडी देऊन ओटीभरण करण्यात आले.
पिढ्यान्पिढ्या चालत आलेला गोंडस पाळण्यांचा वारसा
या वेळी डॉ. संतोष पोटे यांच्या मातोश्रींनी पारंपरिक पाळण्यांच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की,
"पूर्वीच्या काळी गोंडस बाळासाठी खास पाळणे तयार केले जात असत, ज्यामुळे बाळाचा मानसिक व शारीरिक विकास अधिक चांगल्या प्रकारे होत असे. आजच्या काळातही ही परंपरा जपली गेली पाहिजे."
नॉर्मल डिलिव्हरीसाठी डॉ. सुनीता पोटे यांचे विशेष टिप्स
योग्य आहार: ताजे फळे, भाज्या, प्रथिनयुक्त पदार्थ आणि भरपूर पाणी सेवन करणे आवश्यक.
नियमित व्यायाम: चालणे, सौम्य योगासन आणि श्वसनाचे व्यायाम उपयुक्त ठरतात.
सकारात्मक मानसिकता: गरोदरपणात तणाव टाळून आनंदी राहणे महत्त्वाचे.
नैसर्गिक उपाय: तूप, बदाम, खजूर आणि आयुर्वेदिक आहारपद्धतींचा समावेश करावा.
डॉक्टरांचा सल्ला: नियमित तपासणी व डॉक्टरांनी दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करणे गरजेचे.
भारतीय संस्कृतीचा वारसा आणि मातृत्वाचा सन्मान
हा उपक्रम केवळ ओटीभरणाचा कार्यक्रम नव्हता, तर मातृत्वाचा सन्मान करणारा आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करणारा होता. हळदीकुंकू, ओटीभरण आणि गर्भसंस्कार या परंपरांचे केवळ सामाजिक महत्त्व नाही, तर त्या मातृशक्तीला मानसिक आधार देण्यास मदत करतात आणि नव्या पिढीला संस्कारित करण्याचे कार्य करतात.
महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सोहळा अधिक खास
या सोहळ्याने उपस्थित महिलांना नवचैतन्य मिळाले असून, त्यांनी या पारंपरिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून दिलेल्या मार्गदर्शनाचा नक्कीच लाभ घेतला. गर्भवती महिलांसाठी असे उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.