मांडवगण फराटा - तांदळी रस्त्यावर हॉटेल आस्वाद समोर विरुद्ध दिशेने चाललेल्या ऊस वाहतूकीच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
सदर घटना शनिवार (दि.२५) रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास मांडवगण फराटा - तांदळी रस्त्यावर हॉटेल आस्वाद समोर घडली आहे. याबाबत स्वप्निल शांताराम फराटे (वय-२९ रा.मांडवगण फराटा ता शिरुर जि.पुणे )यांनी मांडवगण फराटा पोलीस दुरक्षेत्र येथे फिर्याद दाखल केली आहे.
मांडवगण फराटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर अपघातात संजय पोपट ओव्हाळ (वय -५० रा. नांद्रेमळा, इनामगाव ता. शिरुर जि. पुणे) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रॅक्टर चालक विठ्ठल बाळासाहेब गोलांडे (रा. इनामगाव ता. शिरुर जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करीत ताब्यात घेतले आहे.
ऊस वाहतूक करणारा महिंद्रा कंपनीचा नोवो ६०५ डी.आय ट्रॅक्टर क्रमांक एम. एच १२ पी. झेड ८९८४ हा मांडवगण फराटाहुन तांदळीच्या दिशेने जात होता. तसेच मयत संजय ओव्हाळ हे हिरो कंपनीची एच.एफ डिलक्स दुचाकी क्रमांक एम. एच १२ एक्स एस १३१५ या दुचाकीवरुन मांडवगणकडे येत होते. आस्वाद हॉटेल समोर ऊसाचा टॅक्टर स्वतःची दिशा सोडुन विरुध्द दिशेने जात होता. यावेळी ओव्हाळ यांची दुचाकी ऊस ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीला जोरात धडकली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टर चालक अपघातात मदत न करताच पळून गेला होता.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल गवळी हे करीत आहेत.