शिरूर
( प्रतिनिधी ) डिंग्रजवाडी ता. शिरुर येथे वारंवार नागरिकांना बिबट्याचे दर्शन होऊन काही पशुधनांसह कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केलेला असताना अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
डिंग्रजवाडी ता. शिरुर सह कोरेगाव भीमा, धानोरे, दरेकरवाडी परिसरातील नागरिकांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत काही पशुधनांसह कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केल्याने वनविभागाने संभाजी गव्हाणे यांच्या शेतात पिंजरा लावलेला असताना अखेर आज पहाटेच्या सुमरास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला बिबट्या जेरबंद झाल्याचे समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, याबाबतची माहिती प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांना मिळताच शिरुर वनविभागाचे नियतक्षेत्र अधिकारी बबन दहातोंडे, वनमजूर आनंदा हरगुडे, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व वनविभाग रेस्क्यू टीम मेंबर शेरखान शेख, अमोल कुसाळकर यांनी बिबट्याला ताब्यात घेतले, यावेळी सरपंच प्रकाश गव्हाणे, माजी सरपंच शहाजी गव्हाणे, पोलीस पाटील साईनाथ गव्हाणे, चेअरमन प्रवीण गव्हाणे, उद्योजक कानिफ गव्हाणे, नवनाथ गव्हाणे, संदीप गव्हाणे यांसह आदी उपस्थित होते, सदर ठिकाणी पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या मादी जातीचा तसेच पूर्ण वाढ झालेला असून त्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आली आहे. तर बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.
फोटो खालील ओळ - डिंग्रजवाडी ता. शिरुर येथे पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या.