शिरुर,प्रतिनिधी - भरधाव वेगातील पिक अप गाडीने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटना शिरसगाव काटाच्या (ता. शिरुर) हद्दीत न्हावरे - काष्टी रस्त्यावर येळे वस्ती नजीक गुरुवार (दि.९) रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत किशोर बबन पल्हारे (वय-३८)रा.हंगेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर यांनी मांडवगण फराटा पोलीस दुरक्षेत्र येथे फिर्याद दाखल केली आहे.
मांडवगण फराटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरसगाव काटाच्या हद्दीत न्हावरे - काष्टी रस्त्यावर येळे वस्ती नजिक भरधाव वेगातील पिक अप क्रमांक एम. एच १२ व्ही. टी ९९९२ या गाडीने समोरा समोर दिलेल्या जोरदार धडकेत चांगदेव ठकाराम उच्चे (वय-४०) रा. हंगेवाडी ता. श्रीगोंदा जि.अहिल्यानगर यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. डोक्यातून जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत उच्चे हे शिरसगाव काटा बाजुकडून हंगेवाडी येथे दुचाकी क्रमांक एम. एच २० ए.सी ७०४३ या दुचाकीवरुन घरी जात होते. तर सदर पिक अप गाडी काष्टी बाजूकडून न्हावरेच्या दिशेने भरधाव वेगात जात होती. उच्चे यांना न्हावरे येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पिक अप चालक कोणत्याही प्रकारची मदत न करता पसार झाला आहे. पोलिसांनी सदर पिक अप चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रमेश कदम हे करीत आहेत.