टाकळी हाजी ( ता.शिरूर) येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील घरात एक चोवीस वर्षीय तरुण अल्पवयीन मुलीला घेवून एकांतात राहत असल्याचा धक्कादायक प्रकार शिवबा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमुळे शनिवारी ( दि.१८) उघड झाला.याबाबत संघटनेने पोलिसांना कळविताच त्यांना ताब्यात घेवून या अल्पवयीन मुलीची सुटका करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
गेल्या सहा दिवसांपासून कामाच्या बहाण्याने एक तरुण अल्पवयीन मुलीस घेऊन येथे राहत असल्याची अधिकृत माहिती शिवबा संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष तथा माळवाडीचे सरपंच सोमनाथ भाकरे आणि माऊली घोडे यांना समजल्यानंतर त्यांनी खात्री करून टाकळी हाजी पोलिसांना कळविले. पोलिसांनी याबाबत तात्काळ लक्ष घालून पोलीस हवालदार अनिल आगलावे यांनी त्या तरुणास व अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंस्टाग्राम च्या माध्यमातून वाशिम येथील तरुण व मुंबईतील अल्पवयीन मुलीची लव्हस्टोरी सुरू झाल्याचे समजले. सदर तरुणाने या मुलीला मुंबईवरून येथे आणून ठेवल्याचे या तरुणाने सांगितले.
हा प्रकार लवकर उघडकीस आला नसता, किंवा काही अनुचित प्रकार घडला असता तर मोठा अनर्थ झाला असता. मात्र शिवबा संघटनेच्या सतर्कतेमुळे एका अल्पवयीन मुलीची सुटका झाल्याने या कार्याबद्दल शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांच्यासह टाकळी हाजी ग्रामस्थांनी सोमनाथ भाकरे आणि माऊली घोडे यांचे विशेष कौतुक केले.
शेतातील किंवा व्यावसायिक कामासाठी बाहेरच्या व्यक्तींना आपल्या घरी किंवा खोलीमध्ये राहण्याची व्यवस्था करत असाल तर प्रथमतः त्यांचे आधार कार्ड , पत्ता, मोबाईल नंबर घेऊनच आश्रय द्यावा. असे आवाहन शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी केले आहे.
शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरात कामासाठी येणाऱ्या तरुण-तरुणीं सोबत अनेक धक्कादायक प्रकार घडले असून खोलीमध्ये राहणाऱ्या व्यक्तींचे आधार कार्ड प्रत्येक खोली मालकाने तपासून खातरजमा करूनच खोलीत ठेवले पाहिजे.तसेच अल्पवयीन मुलींना फुस लावून पळविल्याचे अनेक प्रकार ताजे असतानाही गेल्या सहा दिवसांपासून हा तरुण अल्पवयीन मुलीला घेऊन येथे राहत असूनही याबाबत उदासीनता का? यामागील 'आका ' वर कारवाई होणार का ? पोलीस या खोली मालकावर काय कारवाई करतात याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.