मलठण (ता.शिरूर) येथे अष्टविनायक महामार्गावर मलठण- शिंदेवाडी रस्त्यावरील पावर हाऊस जवळ शाळेतून घरी जाणाऱ्या १६ वर्षीय शाळकरी मुलास टेम्पोने धडक देऊन झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे.
दिगंबर रामदास शिंदे (वय-१६ रा.शिंदेवाडी मलठण ता. शिरूर जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत रामदास भिवा शिंदे (रा.शिंदेवाडी मलठण ता.शिरूर जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिगंबर हा मलठण येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे दहावीच्या वर्गात शिकत होता. त्याच्याकडे सायकल नसल्याने तो दररोज शाळेत पायी ये-जा करत होता. शुक्रवारी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. सायंकाळी शाळा सुटल्यावर घरी येत असताना अष्टविनायक महामार्गावर मलठण- शिंदेवाडी रस्त्यावरील पावर हाऊस जवळ ५.१५ वाजण्याच्या सुमारास शिंदेवाडी बाजूने मलठण बाजूकडे जाणाऱ्या एम एच १४ जे एल ६८९६ टेम्पोने समोरून ठोकर दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दिगंबर ला उपचारासाठी शिरूर येथे दाखल करण्यात आले. परंतु डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने पुढील उपचारासाठी अहील्यानगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले.दुर्दैवाने उपचारादरम्यान दिगंबर चा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वारे करीत आहे.