शिरूर चां.ता. बोरा महाविद्यालय येथे ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शनाचे उद्घाटन

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी
      विद्यार्थ्यांनी प्रथम निरीक्षण करायला शिकले पाहिजे व प्रयोग करून त्यातून निष्कर्ष काढावा असा सल्ला मार्गदर्शन नांदेड स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलुगुरु डॉ .पंडित विद्यासागर यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. 
      पुणे जिल्हा परिषद, शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक), पंचायत समिती (शिक्षण विभाग) शिरुर, शिरुर चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरुर आणि शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ' ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यासागर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. 
        तर अध्यक्षस्थानी शिरूर नियामक मंडळाचे सदस्य धरमचंद फुलफगर होते.27 डिसेंबर व 28 डिसेंबर या दोन दिवस हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
     यावेळी शिरूर पंचायत समिती गटविकास अधिकारी महेश डोके,
 पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, नियमक मंडळाची सदस्य धरमचंद फुलफगर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.सी.मोहीते यांचे मार्गदर्शन लाभले तर हे प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उपप्राचार्य एच.एस.जाधव, विज्ञान शाखा प्रमुख डॉ.एन.एम.घनगावकर, समन्वयक डॉ.डी.एच.बोबडे, प्रा.ए.एस.वनवे, तुकाराम बेनके, मारुती कदम, संभाजी ठुबे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, प्राध्यापक व कर्मचारी
उपस्थित होते.
      कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
      यावेळी बोलताना कुलुगुरु डॉ .पंडित विद्यासागर म्हणाले भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी सुद्धा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्याशिवाय विकास होणार नाही अशी भूमिका मांडली होती हेही त्यांनी सांगितले. त्यांनी आपल्या भाषणात रामानुजन, सर सी. व्ही. रामन, जगदीश चंद्र बोस इत्यादी वैज्ञानिकांचे भारताच्या वैज्ञानिक जडणघडणीमध्ये असलेले योगदान स्पष्ट केले. त्याचबरोबर अशा प्रकारची विज्ञान प्रदर्शने आयोजित करून विद्यार्थ्यांवर वैज्ञानिक संस्कार होत आहेत असे सांगून हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले.
   यावेळी विद्याधाम प्रशालेचे विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.सी.मोहिते यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयात वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेवून अविष्कार सारख्या स्पर्धेतून भविष्यातील वैज्ञानिक कसे घडू शकतात हे त्यांनी सांगितले. तसेच देशपातळीवर विज्ञान व तंत्रज्ञानात कसे बदल होत चाललेत हेही नमूद केले. शिक्षक, पालक यांनी विद्यार्थ्यांचे प्रकल्प पाहून कौतूक करावे अशी अपेक्षा व्यक्त करुन विज्ञान प्रदर्शन आयोजन करण्यापाठीमागची भूमिका मांडली.
       या प्रदर्शनात ९२ प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांनी सहभाग नोंदविला असून एकूण १९२ प्रकल्प असल्याचे मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम यांनी सांगितले.
      या विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन समितीचे समन्वयक डॉ. डी.एच. बोबडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा विषद केली. 
शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष धरमचंद फुलफगर यांनी त्यांच्या भाषणात विद्यार्थ्यांनी इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशी स्पर्धा करावी असे त्यांनी सांगितले तसेच महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या ग्रंथालय, प्रयोगशाळा, मैदान इत्यादी सेवांचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांनी संयोजन समितीचे कौतुक केले.
    या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ.क्रांती पैठणकर यांनी केले तर आभार संभाजी ठुबे यांनी मानले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!