शिरूर तालुक्यातील सरदवाडी कारेगाव रांजणगाव गणपती शिक्रापूर या केंद्रातील शाळांना एक जानेवारी शौर्य दिनानिमित्त सुट्टी देण्यात यावी अशी मागणी शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन शिरूर तहसीलदार, शिरूर पंचायत समिती गट विकास अधिकारी ,गटशिक्षणाधिकारी,पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, यांना देण्यात आले आहे.
यावेळी शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संतोष गावडे कोषाध्यक्ष माऊली पुंडे, मार्गदर्शक विलास जासुद , माजी अध्यक्ष संतोष थोपटे सरचिटणीस आ.भै.रसाळ, संघाचे तालुका नेते संतोष शेवाळे, उपस्थित होते.
एक जानेवारी हा शौर्य दिन साजरा होत असताना प्रशासनाच्या वतीने पुणे अहिल्यानगर हा महामार्ग शिरूर न्हावरा फाटा येथून बंद करण्यात येत असतो त्यादिवशी शिरूर तालुक्यातील सरदवाडी, कारेगाव, रांजणगाव गणपती कोंढापुरी शिक्रापूर या केंद्रातील बहुतांश शिक्षक शिरूर शहरातून आपल्या शाळेमध्ये ये जा करत असतात. व ज्ञानदानाचे काम करत असतात. यात पुरुष शिक्षक व महिला शिक्षक या दोघांचाही समावेश आहे. हा महामार्ग बंद असल्याकारणाने या दिवशी शाळांवर पोहोचणे आव्हानाचे होत असून जिल्हा प्रशासनाने याबाबत एक जानेवारी रोजी वरील शाळेना सुट्टी देऊन हा सुट्टीचा दिवस याच महिन्यातील रविवारी शिक्षक वर्ग भरून काढतील. तरी एक जानेवारी रोजी सरदवाडी कारेगाव रांजणगाव गणपती कोंढापुरी शिक्रापूर या केंद्रातील शाळांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.