मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे शुक्रवारी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे केवळ धड सापडले होते. आज सकाळी त्याचे शिर सापडले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान मांडवगण फराटा येथील फराटवाडीजवळ टेंभेकर वस्ती येथे बिबट्याने अचानक हल्ला करत शिवतेज टेंभेकर या चिमुकल्यास उचलून उसात नेले होते. ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला असता, शेतात केवळ त्याचे धड सापडले होते. मात्र, शिर सापडले नव्हते. आज सकाळी घटनास्थळापासून सुमारे २०० मीटर अंतरावर शिवतेजचे शिर सापडले. ते पाहून नातेवाईकांबरोबरच ग्रामस्थांच्याही अश्रूचा बांध फुटला. दरम्यान, आज सकाळी ग्रामस्थांची बैठक माउली मंदिर येथे पार पडली. या बैठकीस जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षण अधिकारी अमोल सातपुते यांसह सहायक वनसंरक्षण अधिकारी स्मिता राजहंस यांसह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांविषयी तक्रारींचा पाढा सातपुते यांच्यासमोर मांडला. बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करा, अशी मागणी केली. या वेळी अमोल सातपुते यांनी सांगितले की, मांडवगण फराटा परिसरात उसाचे क्षेत्र मोठे आहे. तसेच यापूर्वी या भागात बिबट्याने हल्ले केले होते; मात्र त्यात कोणाचाही मृत्यू झाला नव्हता. गेल्या महिन्यात एकाचा मृत्यू व ही दुसरी घटना घडली आहे. वनविभाग या झालेल्या घटनांबाबत संवेदनशील असून, आठ दिवसांत आम्ही बिबट्याला जेरबंद करू, असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.