वयाच्या 17 व्या वर्षात पहिली कादंबरी काढणारा राजन खान हा लेखक मला अचंबित करतो असे सांगून राजन खान यांचे लेखन म्हणजे मानवी जगण्याचा निख्खळ वाहता झरा, जो जगण्यातल्या अगदी बारीक बारीक गोष्टींची मांडणी करतो, म्हणून त्यांचे लिखाण वाचकाला भिडते. राजन खान हे मराठीतले महत्वाचे लेखक असल्याचे सांगून राजन खान व अक्षर मानव चळवळीला सुप्रसिद्ध साहित्यिक रंगनाथ पठारे शुभेच्छा दिल्या.
ज्येष्ठ साहित्यिक, अक्षर मानव संघटनेचे विश्वस्त राजन खान यांचा वाढदिवस हा "अक्षर मानव कुटुंब सोहळा" म्हणून दरवर्षी साजरा केला जातो यावर्षीही राळेगणसिद्धी ता. पारनेर येथे संपन्न झाला.
यावेळी मीरा प्रकाशनाकडून प्रकाशित केल्या गेलेल्या "देश, जमीन आणि संगत विसंगत" या राजन खान यांच्या पुस्तकांचे सुप्रसिद्ध साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते पुनर्प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात "हिंद स्वराज ट्रस्ट" यांच्या सभागृहात झाली. मोठ्या संख्येने अक्षर मानव पदाधिकारी, सदस्य व राजन खान यांचे वाचक चाहते या कार्यक्रमात उपस्थित होते.
सुरुवातीला अक्षर मानव महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण जावळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व रूपरेषा सांगितली. राजन खान व प्रमुख पाहुणे रंगनाथ पठारे यांनी दीपप्रज्वलन करून व त्यांना मानचिन्ह आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
अक्षर मानव आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी अक्षर मानव भूमिका स्पष्ट केली.
यांनतर प्रथम ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थित अक्षर मानव कुटुंबीय व वाचक चाहते यांनी शुभेच्छापर मनोगतं व्यक्त केली. सर्व कुटुंबियांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
मीरा प्रकाशना तर्फे प्रकाशक व अक्षर मानव राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संतोष पोटे म्हणाले प्रकाशित करणे हा मीरा प्रकाशनासाठी एका मोठ्या आनंदाचा भाग आहे आणि एक समाज प्रबोधनाचीच संधी असल्याचे सांगून, आणखीन बरीच राजन खान यांची पुस्तके जी बाजारात उपलब्ध नाहीत ती बाजारात आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
त्यानंतर प्रत्यक्ष राजन खान यांचे मनोगत झाले. ज्यात त्यांनी साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्याशी असलेल्या मैत्रीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. मराठी साहित्य, लेखक, वाचक यांच्या बद्दल मनात असणारे विचार आणि साहित्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन त्यांनी मांडला.
अक्षर मानव पदाधिकारी अरुण मापारी यांनी बनवलेला राजन खान "लेखक ते अक्षर मानव चळवळ" या स्वरूपाचा व्हिडिओ सर्वांना दाखवण्यात आला .
अक्षर मानव महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण जावळे यांनी आभार तर अक्षर मानव राष्ट्रीय उपाध्यक्षा प्रणोती पाटील आणि अक्षर मानव महाराष्ट्र उपाध्यक्ष दीपेश मोहिते यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले