आंधळगाव ता. शिरूर येथे लग्नासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील तब्बल ४ लाख २० हजार रुपये किमतीचे सहा तोळे वजनाचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेले आहे.
याबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी सुनीता अप्पासाहेब गोळेकर (सध्या रा. कमल पार्क, शिरूर, ता. शिरूर, मूळ रा. वडगाव रासाई, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता गोळेकर या पती व कुटुंबासह शिरूर येथे राहतात. रविवारी त्या आंधळगाव येथील शुभम मंगल कार्यालय येथे पती व मुलीसह लग्नासाठी गेल्या होत्या. दरम्यान, त्यांनी त्यांची मोटार येथील न्हावरा ते केडगाव चौफुला रस्त्याच्या कडेला उभी केली होती. लग्नाचा कार्यक्रम उरकल्यानंतर गोळेकर कुटुंब त्यांच्या मोटारीजवळ जात होते. यावेळी न्हावरा बाजूकडून समोरून एका दुचाकीवरून अनोळखी तीन जण त्यांच्या जवळ आले. चोरट्यांनी सुनीता गोळेकर यांच्या गळ्यातील सहा तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावले व दुचाकीवरून भरधाव वेगात ते निघून गेले. याबाबत पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहे.