रांजणगाव परिसरात आठवडे बाजार व प्रवासामध्ये गहाळ झालेले व चोरी झालेले मोबाईल पोलीस पथकाने शोधून ते पुन्हा रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी नागरिकांना परत करून नागरिकांना आगळीवेगळी दिवाळी भेट दिली आहे.
रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव, रांजणगाव परिसरात आठवडे बाजारामध्ये व प्रवासामध्ये मोबाईल गहाळ झाल्याच्या अनेक तक्रारी रांजणगाव पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या आहेत. सदरचे गहाळ झालेले मोबाईल हे ट्रेस करुन पुन्हा नागरीकांना परत करणे सूचना पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी दिल्या होत्या.
रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला गहाळ झालेले मोबाईल पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांचे सूचनेप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे व पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी ट्रेसिंगला लावुन गहाळ झालेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करण्याचे काम सुरु केले होते. बहुतांश नागरीक हे एकदा गहाळ झालेला मोबाईल परत मिळण्याची अशा सोडुन देत असतात परंतु सन 2024 मध्ये आत्तापर्यंत गहाळ झालेल्या मोबाईल पैकी १३ मोबाईल एकूण किंमत २ लाख ५० हजार परत मिळवून पुन्हा पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांचे हस्ते मुळ मोबाईल मालकांना परत करण्यात आले आहेत.
सदरची कामगीरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे विभाग अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहा. फौज. दत्तात्रय शिंदे, पो. कॉ. उमेश कुतवळ, पो.हवा. विलास आंबेकर यांनी केली आहे. इतरही आणखी गहाळ झालेले मोबाईल ट्रेसिंगला लावुन त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगीतले आहे.