शिरूर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी २५ हजाराची लाच मागून त्यापैकी दहा हजाराची लाच खाजगी व्यक्तीच्या मार्फत स्वीकारण्याची तयारी दर्शवणाऱ्या शिरूरच्या पोलीस उपनिरीक्षकासह एका खाजगी व्यक्ती वर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माणिक बाळासाहेब मांडगे(नेमणूक टाकळी हाजी चौकी, शिरूर पोलिस ठाणे) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तर सुभाष मुंजाळ (रा. कावठे यमाई, ता. शिरूर) असे गुन्हा दाखल झालेल्या खासगी व्यक्तीचे नाव आहे,
याबाबत महिलेने लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती.
याबाबत पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार यांच्या मुलावर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, याची चौकशी टाकळी हाजी चौकीत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक माणिक मांडगे करत होते. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी मांडगे यांनी सप्टेंबर महिन्यात २५ हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांच्या तक्रारीनंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचासोबत पडताळणी केली होती. यात तडजोडी अंती मध्यस्थ सुभाष गुंजाळ याच्या माध्यमातून १० हजार स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. यावरून आज शिरूर पोलिस ठाण्यात मांडगे व गुंजाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून ,
अधिक तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करत आहेत
