शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या वतीने ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांना उमेदवारी जाहीर झाली असून आता शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार अशोक पवार व माऊली कटके अशी दुरंगी लढत होणार आहे.
गेल्या अनेक दिवसापासून शिरूर हवेली मतदारसंघासाठी महायुतीचा तिढा सुटत नव्हता, त्यामुळे उमेदवार कोण? अशी चर्चा होती परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याच दिवशी त्यांची उमेदवारी निश्चित झाली होती.
त्यात भारतीय जनता पार्टीचे शिरूर हवेलीतील कार्यकर्ते भाजपाला जागा मिळावी यासाठी आग्रही होती परंतु त्यासाठीचे उमेदवार असणारे प्रदीप कंद काही दिवसांपासून मात्र निवडणुकी संदर्भात म्हणावे असे उत्सुक नसल्याचे दिसून आले होते.
तर भाजपाकडे दुसरा तगडा उमेदवार या निवडणुकीसाठी नसल्याने भाजपाची कोंडी झाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस कडे अनेक नेते होते परंतु सक्षम आर्थिकदृष्ट्या उमेदवार नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची कोंडी झाली होती.
काही महिन्यांपासून उज्जैन महाकाल दर्शन ट्रिपने चर्चेत आलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांना अजित पवार यांनी गळाला लावले. त्यांचा पक्षात प्रवेश घेऊन आज त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
ही उमेदवारी जाहीर झाली असली तरी शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा लोकसभेची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा सुरू आहे.
आता शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अशोक पवार व माऊली कटके अशी दुरंगी होणार शंका नाही.