शिंदेवाडीत घरभाडे न दिल्याने भाडेकरूला बेदम मारहाण
मलठण (ता. शिरूर) येथील शिंदेवाडी येथे घरभाडे न दिल्याने भाडेकरूला शेतात घेऊन जात बेदम मारहाण करून विहिरीत टाकण्याची धमकी दिल्या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाऊ भामा शिंदे (रा. शिंदेवाडी मलठण, ता. शिरूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
अशोक नामदेव भामरे (वय ५०, रा. शिंदेवाडी मलठण, ता. शिरूर, मूळ रा. सटाणा, जि. नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेवाडी येथे भाऊ शिंदे यांच्या खोलीमध्ये अशोक भामरे राहत होते. भामरे यांनी दोन महिने भाडे न दिल्याने शिंदे हे त्यांना दुचाकीहून शेताकडे घेऊन गेले. मात्र, रस्त्यातच थांबवून दोन महिने घरभाडे का दिले नाही, असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करत काठीने मारहाण केली. त्यानंतर विहिरीजवळ ओढत नेऊन विहिरीमध्ये ढकलून देण्याची धमकी दिली. त्यानंतर भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हवालदार शिवाजी खेडकर तपास करत आहेत.
