आमदाबाद (ता. शिरूर ) येथील प्रगतशील शेतकरी सुजाता नितीन थोरात यांना महाराष्ट्र सरकारकडून जाहीर झालेला वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २७-०९-२०२४ रोजी मुंबई येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, कृषी विभागाच्या प्रधान सचिव व्ही राधा, संचालक कृषी नायकवडी तसेच इतर प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.थोरात यांना रोख रक्कम ४४हजार रूपये व एक पैठणी साडी देण्यात आली.
शिरूर तालुक्याला सुजाता थोरात यांच्या रुपाने हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यामुळे शिरूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. फेब्रुवारी २०२४ रोजी शासनाकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती.
सुजाता थोरात यांचे पती नितीन थोरात हे देखील प्रगतशील शेतकरी आहेत. आज पुरस्कार मिळाल्यानंतर सुजाता थोरात व त्यांच्या परिवाराने आनंद व्यक्त केला. थोरात यांच्या निवडीने शिरूर व आमदाबाद परिसरातील शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.दरम्यान, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय व आदर्शवत काम करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना तालुका पंचायत समितीच्या शिफारसीने पुणे जिल्हा परिषदकडूनही थोरात यांना "कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार" देण्यात आला होता. यावेळी बोलताना प्रगतशील शेतकरी सुजाता थोरात म्हणाल्या शेतकरी भविष्यात हायटेक शेतीकडे वळाल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक सुबत्तीकडे वाटचाल होऊन, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबतील, यासाठी पुढील काळात हायटेक शेती करणारे शेतकरी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.