शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड कंपनी विरोधात ग्रामपंचायत अण्णापुर, सरदवाडी, शिरूर ग्रामीण , कर्डेलवाडी, आमदाबाद, निमगाव भोगी, तर्डोबाची वाडी, शिरूर नगर परिषद या गावातील संतप्त नागरिकांनी रांजणगाव गणपती समोर पुणे नगर महामार्गावर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यामुळे मोठ्या प्रमाणात पुणे नगर रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
दिनांक ५ ऑक्टोबर २४ पर्यंत या कंपनीला दिलेले वाढीव क्षेत्र रद्द झाले नाही आणि कंपनी कायम स्वरुपी बंद झाली नाही तर कंपनी च्या गेटवर मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल आणि स्वतः शेतकरी कंपनी बंद करतील असा इशारा आंदोलनकर्ते नागरिक व शेतकऱ्यांनी दिला आहे.
एम इ पी एल हटवा गाव वाचवा.... जीवन वाचवा अशा गगनभेदी घोषणा यावेळी बाधित गावांच्या शेतकरी व नागरिकांनी दिल्या.
महाराष्ट्र प्रदूषण बोर्डच सर्वाधिक प्रदूषित आहे, त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे परिसरात रोगराई वाढली असल्यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असून संबधीत कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सुरेश भोर यांनी केली आहे. कंपनीने शासनाच्या कोणत्याही नियमांचे पालन केले नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिवसेना उद्धव गटाचे तालुका प्रमुख भोलेनाथ पडवळ यांनी या आंदोलनाच्या केसेस मोफत लढणार असल्याचे सांगितले. प्रशासन निवेदनाला कराची टोपली दाखवत आहे. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेखर पाचुंदकर यांनी दिला आहे. यावेळी सुरेश भोर, शेखर पाचुंदकर राहुल पाचर्णे, यशवंत पाचंगे, शशिकांत दसगुडे, आबासाहेब सरोदे, विक्रम पाचुंदकर, विठ्ठल पवार, ऍड भोलेनाथ पडवळ, गणेश सरोदे, संतोष शिंदे, उज्वला अंकुश इचके, उत्तम व्यवहारे, लक्ष्मण सांबारे,सचिन सांबारे, सोन्याबापू दसगुडे, प्रकाश थोरात, संजय शिंदे, गणेश कर्डीले, संतोष कर्डीले, अरुण घावटे, राणी कर्डीले, विठ्ठल घावटे, मंडलाधिकारी स्वाती टाव्हरे, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, महादेव वाघमोडे यांसह शासनाचे विविध विभागाचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिरुर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) या कंपनीतून विषारी केमिकलचे पेसाळयुक्त काळे पाणी आसपासच्या परिसरातील ओढया नाल्यांमधुन वाहत येत आहे. ओढ्याला काळ्या व लाल रंगाचे पाणी, तसेच ओढ्याच्या बंधाऱ्यावरुन पडणारे पाणी आपटल्यानंतर पांढऱ्या रंगाच्या फेसाचे ढिग तयार होतात. हे दुषित पाणी जमिनीत मुरत असुन तेच पाणी झिपरुन विहीरीत जात आहे. तसेच नाईलाजास्तव तेच पाणी पिण्यासाठी वापरात येत असल्याने या परीसरातील हजारो नागरीकांना कर्करोग, कॅन्सर, त्वचारोग यांना बळी पडावे लागत आहे. या भागात असंख्य रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली असल्याचे निदर्शनात आले आहे. अनेक जनावरे यामुळे दगावले आहेत तर जनावरांनाही गंभीर आजार झाले आहे या भागातील या दूषित पाण्यामुळे जमिनीचा पोत कमी झाला असून जमिनी पांढऱ्या फकट पडत आहे तर अनेक वेळा पिके जळून जात आहे फळझाडाही जळून गेले आहेत. याबाबत अनेक वेळा प्रशासनाला सांगून सुद्धा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
निमगाव भोगी, आण्णापुर, रामलिंग, कर्डीलवाडी, सरदवाडी, कारेगाव, शिरुर ग्रामीण, ढोकसांगवी या गावातील ओढे-नाले, विहिरी, बोअरवेलचे पाणी पुर्णपणे दुषित झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड हि कंपनी कायमस्वरुपी बंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.