बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आहे. आज (दि. 23) बदलापूर पोलिसांचे पथक त्याचा ताबा घेऊन पोलिस ठाण्याकडे जात होते. या यादरम्यान आरोपी अक्षयने पोलिसाकडची बंदूक अचानक हिसाकावून घेत गोळी झाडण्याचा प्रयत्न केला.
यावेळी इतर पोलिसांनी त्याच्यावर स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात अक्षय गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
अक्षय शिंदे याने पोलिसांवर देखील गोळीबार केल्याची माहिती आहे. तळोजा कारागृहातून साडेपाच वाजता त्याला घेऊन बदलापूरला जात असताना ही घटना घडली आहे. पोलिसांची बंदूक हिसकावून घेत त्याने पोलिसांवर गोळीबार केला.
मिळालेल्या माहितीनुसार, आज ठाणे क्राईम ब्रांच युनिटने तळोजा जेलमधून आरोपी अक्षय शिंदेचा ताबा घेतला होता. आरोपीच्या पहिल्या पत्नीच्या तक्रारी प्रकरणी चौकशीकरिता कोर्टाच्या परवानगीनंतर अक्षय शिंदेचा ताबा क्राईम ब्रांचने घेतला होता. आज (२३ सप्टेंबर) ५.३० च्या सुमारास क्राईम ब्रांचचे पथक आरोपीचा ताबा घेवून तळोजा मधून निघाले होते. या ताफ्यामध्ये एपीआय दर्जाचे अधिकारी निलेश मोरे हे होते. त्याच दरम्यान, आरोपीने अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून त्यांच्या पायावर गोळी मारली. एकूण तीन राउंड फायर केल्याची माहिती आहे. अखेर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीवर गोळीबार केला. यामध्ये आरोपीचा मृत्यू झाला, मात्र, अधिक माहिती अजून काही आलेली नाही.
आरोपीला जखमी अवस्थेत छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल (कळवा) येथे नेण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये जखमी झालेले पोलीस अधिकाऱ्यांचा तेथेच उपचार सुरु होते, मात्र नंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान, आरोपीच्या एन्काउंटरवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री-गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
प्रकरण काय
बदलापूरच्या एका नामांकित (Badlapur Case) शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली होती. आरोपीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती. या घटनेचा तपास करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती.
कोण आहे अक्षय शिंदे?
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय मूळचा कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील एका गावातील आहे. मात्र त्याचा जन्म बदलापूरमधील खरवई गावात झाला. तो खरवई गावातील एका चाळीत आपले आई-वडील, भाऊ आणि भावाच्या पत्नीसोबत राहत होता. अक्षय शिंदे केवळ २४ वर्षांचा असून त्याची तीन लग्ने झाली आहेत. मात्र त्याच्या विक्षिप्त वागण्यामुळे तीनही पत्नी त्याला सोडून गेल्या असून तो आई-वडील व भावाच्या कुटूंबासोबत रहात होता. अक्षयने दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तो बदलापूरमधील एका शाळेत शिपाई म्हणून काम करत होता. याआधी तो एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. त्यानंतर एका कंत्राटाद्वारे त्याला बदलापूरच्या आदर्श शाळेत शिपाई म्हणून नोकरी मिळाली.