शिरूर
( प्रतिनिधी ) कोंढापुरी ता. शिरुर येथील दोन विद्युत रोहीत्र फोडून त्यातील तांब्याच्या पट्ट्या चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंढापुरी ता. शिरुर येथील विद्युत प्रवाह खंडित झाल्याने येथील शेतकरी माणिक गायकवाड हे विद्युत रोहित्राजवळ गेले असता त्यांना विद्युत रोहित्र तुटलेले दिसल्याने त्यांनी विद्युत वितरणच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली असता कर्मचाऱ्यांनी तेथे जात पाहणी केली असता दोन वेगवेगळ्या ठिकाणचे विद्युत रोहित्र चोरट्यांनी फोडून त्यातील तांब्याच्या पट्ट्या चोरून नेल्याचे समोर आले, याबाबत विद्युत वितरण विभागाचे विद्युत सहाय्यक अरबाज युनुसखान पठाण रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंगेश लांडगे हे करत आहे.