शिरूर
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथे एटीएम मधून पैसे काढणाऱ्या इसमाचे एटीएम हातचलाखीने घेऊन जाऊन इसमाच्या खात्यातील पंचेचाळीस हजार रुपये लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील एचडीएफसी बँकेमध्ये सुरेश साबळे हे पैसे काढण्यासाठी आलेले असताना त्यांच्या पाठीमागे एक अनोळखी इसम उभा होता, काही वेळाने साबळे पैसे काढून गेल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर पैसे काढण्याबाबत मेसेज आल्याने त्यांनी चौकशी केली असता त्यांच्या पाठीमागे असलेल्या इसमाने हातचलाखीने एटीएम घेऊन जाऊन साबळे यांच्या एटीएम मधून शिक्रापूर, रांजणगाव गणपती यांसह आदी ठिकाणच्या एटीएम मधून साबळे यांच्या बँक खात्यातील पंचेचाळीस हजार रुपये लांबवले असल्याचे समोर आले, याबाबत सुरेश राजाराम साबळे वय ५९ वर्षे रा. कासारी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवलदार विश्म्वंबर वाघमारे हे करत आहे.