शिरूर प्रतिनिधी
वाघोली येथील पाणी, वाहतूक कोंडी, सांडपाणी आणि मालमत्ता कर या समस्यांवरील उपाययोजनेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रावलक्ष्मी फाऊंडेशनच्या वतीने 'रन फॉर वाघोली' या मॅरेथॉनमध्ये भर पावसात वाघोलीतील नागरिक रस्त्यावर धावले.
वाघोलीच्या स्थानिक नागरिकांच्या अडीअडचणी मूलभूत गरजा मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन अपयशी ठरले असून अशा प्रकारची रन फॉर वाघोली ही मॅरेथॉन घेऊन प्रशासनाची लक्ष वेधणारी राज्यातील पहिली मॅरेथॉन ठरली आहे.
महापालिकेने वाघोलीतील समस्यांकडे लक्ष दिले नाही तर महापालिकेवर धाव घेणार असल्याचा इशारा मॅरेथॉनमध्ये उपस्थित नागरिक व लोकप्रतिनिधींनी दिला.
वाघोलीतील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रन फॉर वाघोली या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन वाघोलीत रविवारी (दि. २५) करण्यात आले होते. या स्पर्धेला वाघोलीतील नागरिकांनी भर पावसात चांगला प्रतिसाद दिला. वाघोलीतीलच नव्हे तर शिरूर हवेली मतदार संघातील नागरिकही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व नियोजनासाठी होते. चार वयोगटातआयोजित मॅरेथॉनला अभिषेक लॉन्स येथून सुरुवात झाली. नगर रोड मार्गे बकोरी फाटा येथे दत्तकृपा पार्किंग येथे समारोप झाला. पुरुष व महिला गटात प्रथम तीन क्रमांक आलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्हांचे वाटप धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार अशोक पवार , जिल्हा परिषद माजी सभापती सुजाता पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.