बुरुंजवाडी ता. शिरुर गावच्या हद्दीमध्ये शिक्रापूर व बुरुंजवाडी गावच्या सिमेवर सुरु असलेल्या जमीन मोजणीला विरोध करत महिलांनी चक्क अंगवर डिझेल ओतून घेत पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला असून शिक्रापूर पोलिसांनी एका पुरुषा, दोन महिलांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
महिला पोलीस शिपाई रुपाली बाळासाहेब निंभोरे (वय २८ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अमोल बाळासाहेब वाबळे (वय २९ वर्षे रा. वाबळेवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे), सुरेखा बापूसाहेब पुंडे (वय ३४ वर्षे रा. कान्हूर मेसाई ता. शिरुर जि. पुणे), सुजाता अर्जुन खैरे (वय ३६ वर्षे रा. खैरेनगर ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे बुरुंजवाडी ता. शिरुर गावच्या हद्दीमध्ये शिक्रापूर व बुरुंजवाडी गावच्या सिमेवर असलेल्या जमिनीची पोलीस संरक्षणात मोजणी करण्यात येत असताना पोलीस बंदोबस्तासाठी पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार गणेश करपे, विकास सरोदे, हनुमंत गिरमकर, प्रतिक जगताप, अंकुश चौधरी, योगेश आव्हाड, महिला पोलीस हवालदार किरण निकम, रुपाली निंभोरे हे उपस्थित होते, यावेळी भूमापक अधिकारी एस. बी. पाटील हे जमिनीची मोजणी करत असताना अमोल वाबळे, सुरेखा पुंडे, सुजाता खैरे यांसह काही महिला व इसम सदर ठिकाणी त्यांनी येथील जमीन मोजणीला विरोध करत चक्क अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, यावेळी महिलेच्या हातामध्ये असलेली काडीपेटी ओढून घेण्यासाठी पोलीस कर्मचारी गेलेले असताना महिलेच्या बाजूला करण्यासाठी गेले असताना एका पोलिसाच्या अंगावर डिझेल पडून पोलीस कर्मचारी डिझेलने ओलाचिंब झाला तर एका पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला किरकोळ जखम झाली, मात्र यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला गेला आहे, महिला पोलिसांनी फिर्याद दिल्याने एका पुरुष व दोन महिलांवर अदखलपात्र गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस करत आहे.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथे अंगावर डिझेल ओतून घेणाऱ्या महिलांना ताब्यात घेताना पोलीस