दागिने व रकमेसह सापडलेली पर्स मुळ मालकाला परत
निमगाव म्हाळुंगीतील शेतकरी दांपत्याचा प्रामाणिकपणा
शिरूर
( प्रतिनिधी ) सध्या अनेक ठिकाणी प्रामाणिकपणा नाहीसा होत असून पैशाच्या हव्यासापायी अनेक घटना घडल्याच्या पाहायला मिळत असताना रस्त्याने जाताना दागिने व रकमेसह सापडलेली पर्स निमगाव म्हाळुंगीतील शेतकरी दाम्पत्यांने मूळ मालकाला परत करत समाजात माणुसकी जिवंत असल्याचे दर्शन घडवले आहे. 
निमगाव म्हाळुंगी ता. शिरुर येथील मनोहर संभाजी चव्हाण हे २७ जून रोजी गावातील रणसिंग मळा रस्त्याने दुध डेअरीवर दुध देऊन घरी परतत असताना त्यांना रस्त्यावर एक पर्स सापडल्याने त्यांनी पर्स ताब्यात घेऊन घरी जात पत्नी रुपाली यांना दाखवत पर्सची पाहणी केली असता त्यामध्ये ५ तोळे सोन्याचे दागिने, काही रोख रक्कम, फोटो, एटीएम कार्ड व काही कागदपत्रे मिळून आल्याने त्यांनी पर्समधील फोटो व ओळखपत्राच्या आधारे हनुमंत रामभाऊ रणसिंग यांचा मोबाईल नंबर मिळवत त्यांच्याशी संपर्क साधत काही हरवले आहे का याची विचारपूस करुन वर्णन विचारले असता हनुमंत व त्यांच्या पत्नीने अचुक माहिती सांगितल्याने मनोहर चव्हाण यांनी रणसिंग दाम्पत्याला घरी बोलावत दागिने व रोख रकमेसह पर्स त्यांच्याकडे सुपूर्द केली. दरम्यान पर्स मधील दागिने व रोख रक्कम पाहुन रणसिंग दाम्पत्याला अत्यानंद झाला, तर मनोहर चव्हाण यांच्या प्रामाणिकपणा बद्दल आभार मानत काही बक्षीस देऊ केले मात्र त्यांनी बक्षीस नाकारले मात्र मनोहर चव्हाण यांच्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचे कौतुक होत असून लवकरच ग्रामपंचायतच्या वतीने चव्हाण दांपत्याचा सन्मान करण्यात येणार असल्याचे सरपंच बापुसाहेब काळे यांनी सांगितले.
सोबत – चव्हाण दांपत्यांचा फोटो.