शिरूर तालुक्यातील भिमा नदीत पाण्याचा विसर्ग वाढला असल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली आहे त्यामुळे नदिकडील वस्त्या गावे यांना सतर्कतेचा इशारा दिला असून, या नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असल्याची माहिती शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिली आहे.
भीमा नदी मध्ये होणाऱ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्गामुळे शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई ते नांदगाव पूल पुराच्या पाण्यामुळे पाण्याखाली गेला आहे. तर या भागातील तांदळी मांडवगण फराटा सादलगाव वडगाव रासाई,, रांजणगाव सांडस, विठ्ठलवाडी तळेगाव ढमढेरे, कोरेगाव भीमा, व इतर शिरूर तालुक्यातील भीमा नदीकडील गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, या भागातील ग्रामपंचायतींना दवंडी देऊन सावध राहण्याचे सांगितले आहे.
भीमा नदीतून होणाऱ्या विसर्ग बाबत नदीवरील छोटे पूल, बंधारा वरील वाहतूक बंद केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला या पुलावरील रस्ते बंद करण्याचे आदेश दिले तर पोलिसांनाही या भागात ग्रस्त घालण्याच्या सूचना दिल्या असल्याचे शिरूर चे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले.