शिरूर
( प्रतिनिधी ) पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी काल पासून संततधार पाऊस सुरु असल्याने अनेक दुर्घटना घडत असताना कासारी येथे एका ज्येष्ठ दांपत्याच्या राहत्या घराची भिंत कोसळून दुर्घटना घडली असून सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नसून शासनाने तातडीने घर बांधून देण्याची मागणी सदर दाम्पत्याने केली आहे.
कासारी ता. शिरुर येथील वसू मळा येथे राहणारे चंदर माकर व सखूबाई माकर हे ज्येष्ठ दांपत्य घरात झोपलेले असताना आज २५ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास अचानकपणे घराची भिंत कोसळली, यावेळी चंदर माकर यांनी आरडा ओरडा केल्याने शेजारील नागरिक मदतीसाठी आले आणि त्यांनी या दाम्पत्याला बाहेर घेतले, सुदैवाने घराच्या भिंती बाहेरील बाजूला पडल्याने घरात झोपलेल्या दाम्पत्याला काही इजा झाली नसून त्यांनी घरात बांधलेली शेळी देखील सुखरूप बचावली आहे, तर यावेळी शेजारील निवृत्ती रासकर यांच्या देखील गोठ्याची भिंत कोसळली आहे, घटनेची माहिती मिळाल्यानंतर विस्ताराधिकारी रामेश्वर राठोड, ग्रामविकास अधिकारी वसंत पवार, तलाठी श्रद्धा शिरसाठ यांनी सदर ठिकाणी पाहणी करत पंचनामा केला, यावेळी माजी सरपंच गुलाब सातपुते, संभाजी भुजबळ, सुखदेव भुजबळ, निवृत्ती रासकर, चेअरमन दिलीप रासकर, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नवनाथ भुजबळ, सोमनाथ भुजबळ, उमेश शितोळे, संतोष नवले, अरुण रासकर यांसह आदी उपस्थित होते, सदर दुर्घटनेतील माकर यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने शासनाने त्यांना मदत द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नवनाथ भुजबळ यांनी केली आहे.
स्वतंत्र चौकट १ –
पंचनामा वरिष्ठ कार्यालयास पाठवणार – श्रद्धा शिरसाठ ( तलाठी )
कासारी येथील वसू मळा येथे माकर कुटुंबियांच्या घराची भिंत पडल्याची माहिती मिळालेली असून आम्ही विस्ताराधिकारी व ग्रामविकास अधिकाऱ्यांसह काही ग्रामस्थांच्या उपस्थितीत घटनेचा तातडीने पंचनामा केला असून सदर पंचनामा वरिष्ठ कार्यालयास पाठवत असल्याचे तलाठी श्रद्धा शिरसाठ यांनी सांगितले.
फोटो खालील ओळ – कासारी ता. शिरुर येथील वसु मळा येथे घराची कोसळलेली भिंत.