शिरूर ( प्रतिनिधी )
शिक्रापूर ता. शिरुर येथील माजी उपसरपंचास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघा जणांवर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी उपसरपंच रमेश थोरात यांनी एक मे रोजी विहिरीत आत्महत्या केली होती.
याबाबत शिक्रापूरचे त्यांचा मुलगा तुषार रमेश थोरात (वय २८ वर्षे रा. इकोग्राम सोसायटी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे ) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती.
सुधीर ढमढेरे (रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे), बबनराव गायकवाड व सचिन पारखे ( पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे शिक्रापूर ता. शिरुर येथील माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य रमेश थोरात यांनी १ मे रोजी विहिरीमध्ये आत्महत्या केली असून त्यांच्या मुलाने शिक्रापूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार रमेश थोरात हे सप्तर्षी डेव्हलपर्स मध्ये भागीदार असून त्या व्यवसायातून थोरात यांना काही पैसे मिळालेले असताना त्यांच्या हिस्स्याचे ,28 लाख रुपये त्यांना देण्यास सदर सप्तर्षी डेव्हलपर्सचे अन्य भागीदार सुधीर ढमढेरे, बबनराव गायकवाड व सचिन पारखे हे टाळाटाळ करत असल्याने रमेश थोरात तणावात होते, त्यांनतर रमेश थोरात यांनी वेळोवेळी सुधीर ढमढेरे यांना फोन व मेसेज करुन त्यांच्या हिस्स्याचे पैसे मागितले होते, मात्र वारंवार पैशाची मागणी करुन देखील तिघेजण त्यांना पैसे देण्यात टाळाटाळ करुन पैसे देत नसल्याने रमेश थोरात यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.
सुधीर ढमढेरे, बबनराव गायकवाड व सचिन पारखे यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहे.