शिक्रापूर परिसरात डेंगूसदृश रुग्णांमध्ये वाढ
शिरूर
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरूर परिसरामध्ये अनेक ठिकाणी सध्या तापाच्या आजाराने नागरिक ग्रासलेले असून काही नागरिकांना डेंगू आजार झाल्याबाबत आहवाल प्राप्त झालेले असताना डेंगू सदृश आजारांच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने परिसरात खळबळ उडाली असून ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहे.
शिक्रापूर ता. शिरूर परिसरामध्ये सध्या स्वच्छतेचा मोठ्या प्रमाणात अभाव होत असून नागरिकांच्या आरोग्याच्या हेतूने कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नसल्याचे दिसून येत असताना अनेक भागामध्ये तापांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे, सध्या शिक्रापूर परिसरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये डेंगू आजारांचे रुग्ण उपचार घेत आहेत, मात्र गावामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात डेंगूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना देखील गावातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा व दुर्गंधी असल्याचे आढळून येत आहे, त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांच्या आरोग्याच्या हेतूकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे, ग्रामपंचायत विभाग व आरोग्य प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याच्या समस्येकडे लक्ष केंद्रित करून गावातील सर्व परिसरांमध्ये औषध फवारणी करण्याची मागणी नागरिक व ग्रामस्थ करत आहेत.
स्वतंत्र चौकट १ –
शिक्रापूर गावामध्ये ज्या ठिकाणी डेंगूचे रुग्ण आढळून आल्याबाबतचा अहवाल प्राप्त झाला त्या ठिकाणी तातडीने औषध फवारणी सुरु केली असून संपूर्ण गावात देखील फवारणी सुरु असून गावामध्ये वेळोवेळी औषध फवारणी केली जाणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.