शिरूर (प्रतिनिधी ) पोलिसांना खाकी वर्दीतील देव माणूस असे म्हटले जाते मात्र त्याची प्रचीती एखाद्या घटनेतून आल्याचे दिसून येते अशीच प्रचीती शिक्रापूर मध्ये आल्याने शिक्रापूर पोलीस प्रवासातील गरोदर महिलेसाठी देवदूत बनल्याचे दिसून आले.
शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशवा वाबळे व पोलीस हवालदार आत्माराम तळोले हे दोघे रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास रात्रगस्त करत असताना पुणे नगर महामार्गावरील मलठण फाटा येथे एक बस थांबलेली आणि नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसल्याने पोलीस बसजवळ गेले असता पुण्याहून आई व सासू सोबत बुलढाणा येथे चाललेल्या अस्मिता दांडगे या गरोदर महिलेचे पोट दुखू लागल्याचे समजले, दरम्यान पोलीस हवालदार आत्माराम तळोले यांनी काही रुग्णवाहिकांना फोन केला मात्र तो पर्यंत महिलेच्या वेदना वाढू लागल्याने ती ओरडू लागली यावेळी आत्माराम यांनी महिलेच्या आई व सासूची परवानगी घेत अस्मिताला विशिष्ट पद्धतीने झोपण्यास सांगितले असता काही क्षणात अस्मिताने गोंडस बाळाला जन्म दिला परंतु कोणीही महिला मदतीसाठी जवळ येईना, यावेळी अस्मिताच्या आई व सासूने पोलिसांना हात जोडले काही वेळात रुग्णवाहिका आल्याने पोलिसांनी अस्मिताला बाळासह उपचारासाठी रुग्णालयात नेले, यावेळी अस्मिताने मोठ्या आनंदाने पतीला फोन करत आपल्याला मुलगा झाल्याची आनंदाची बातमी देत पोलिसांचे आभार मानत साहेब तुम्ही माझ्यासाठी वर्दीतील विठ्ठल बनून देवासारखे धावून आल्याची भावना व्यक्त केली, त्यांनतर काही वेळ पोलिसांनी पुन्हा रुग्णालयात थांबून सदर महिलेला पुन्हा प्रवासासाठी बसवून देऊन त्यांचा आनंदाने निरोप घेतला. त्यांनतर सहाय्यक पोलीस निरीक्षक केशवा वाबळे व पोलीस हवालदार आत्माराम तळोले यांचे अनेकांनी कौतुक केले.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथे गरोदर महिलेसाठी देवदूत झालेले पोलीस व महिला आणि तिचे नातेवाईक.