मंगळवार २५ जून पासून राज्यात सर्वत्र नवीन मतदान नोंदणी, पत्ते बदलणे, नाव वगळण्यााठी विशेष मोहीम जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. महिनाभर ही मोहीम सुरू राहणार आहे. त्यानंतर २० ऑगस्टला अंतिम मतदारयादी जाहीर होणार असून, शिरूर तालुका व शिरूर विधानसभेतील मतदारांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीतील मतदारयादीसह मतदान केंद्रातील घोळ समोर आल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने आता महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान नोंदणीवर लक्ष केंद्रित केले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान नोंदणीपासून ते पत्ता बदलण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाला दिली आहे. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची सोमवारी बैठक घेतली. या बैठकीनंतर मतदार नोंदणीसाठीच्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर उपस्थित होत्या. '
विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मंगळवारपासून पुणे जिल्ह्यात नवमतदारांना नोंदणी करता येणार आहे. पत्ता बदलणे, नाव वगळणे; तसेच मतदान ओळखपत्रावरील जुना फोटो असेल, तर नवा फोटो देऊन 'इपिक' कार्डही नवे मिळविणे शक्य होणार आहे. आजपासून शहरासह जिल्ह्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन नवमतदार, पत्ता बदलणे किंवा मयताचे नाव वगळण्याबाबत सर्वेक्षण करणार आहेत. २४ जुलैपर्यंत मतदार नोंदणी करता येईल.
मोहिमेत काय होणार?
• मतदारयादीमधील चुकांची दुरुस्ती होणार
■ जुने फोटो बदलणे, पत्त्यामध्ये आणि नावांमध्ये दुरुस्ती करण्यात येणार
■ मतदान केंद्रांची सीमा निश्चित करणे
• भागयाद्यांची पडताळणी करून नव्या मतदान केंद्रांची निर्मिती करणे यांसारख्या प्रक्रिया पूर्ण होणार
■ 'इपिक' कार्डमधील चुकांची दुरुस्ती होणार
■ नव्या मतदान केंद्रांचा शोध
असा असेल कार्यक्रम ?
■ आजपासून ते २४ जुलैपर्यंत मतदार नोंदणी सुरू राहणार
■ २५ जुलैला प्रारुप मतदारयादी
■ दावे, हरकती करण्याची नऊ ऑगस्टपर्यंत मुदत
■ १९ ऑगस्टपर्यंत सुनावणी होऊन हरकती दूर करणार
■ २० ऑगस्टला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार