शिक्रापूर शरद सहकारी बँकेच्या वसुली अधिकाऱ्यावर २ लाख २१ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

9 Star News
0
शिक्रापूर शरद सहकारी बँकेच्या वसुली अधिकाऱ्यावर २ लाख २१ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

शिरूर प्रतिनिधी 
कर्ज प्रकरणी दाखल असलेल्या सर्व केसेस मागे घेण्याकरीता २ लाख २१ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी शिक्रापूर (ता. शिरूर) येथील शरद सहकारी बँकेच्या वसुली अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. राजाराम मारुती डेरे असे गुन्हा दाखल झालेल्या वसुली अधिकाऱ्याचे नाव आहे.

याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार यांनी शिरूर पोलीस ठाण्यात सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे. तर एका ४२ वर्षीय व्यक्तीने लाचेची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सन २०१३ मध्ये त्यांच्या मित्रासाठी शरद सहकारी बैंक, शाखा शिक्रापुर येथील ०३ कोटी रुपयाच्या कर्ज प्रकरणास जामीनदार राहीले होते. सदर कर्जाची रक्कम थकल्याने अपर निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी वसूली अधिकारी राजाराम डेरे यांची नियुक्ती केली होती.

कर्जदार हे रक्कम भरण्यास अपात्र झाल्याने कर्जदार व जामीनदाराविरुद्ध विविध केसेस दाखल करण्यात आले होते. तक्रारदार यांनी जामीनदार म्हणून नैतिक जबाबदारी स्विकारुन मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल करून उर्वरित कर्जाची सर्व रक्कम जामीनदार या नात्याने कर्ज खात्यात भरली व कर्ज बाकी नसल्याचा बँकेकडून दाखला घेतला.

तक्रारदार यांनी बँकेच्या संचालक मंडळास कर्ज वसुलीच्या दरम्यान लावलेल्या सर्व केसेस मागे घेण्याबाबत विनंती अर्ज केला होता. त्यास शिक्रापुर येथील शरद सहकारी बँकेने मान्यता दिली व तसा आदेश बँकेने वसुली अधिकारी राजाराम डेरे यांना दिला होता. त्याबाबत तक्रारदार हे वसुली अधिकारी राजाराम डेरे यांचेकडे पाठपुरावा करीत होते.

दरम्यान, वसुली अधिकारी राजाराम डेरे यांनी तक्रारदार यांच्याकडे थकीत कर्ज प्रकरणी दाखल केलेल्या सर्व केसेस मागे घेण्याकरीता ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, लोकसेवक राजाराम डेरे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्याविरूध्द कर्ज प्रकरणी दाखल असलेल्या सर्व केसेस मागे घेण्याकरीता कर्जाच्या प्रिन्सीपल रक्कमेच्या १ टक्के म्हणजेच ३ लाख २८ हजार रुपयांची लाच मागणी करुन, तडजोडीअंती २ लाख २१ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी राजाराम डेरे याच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!