अंगारकी चतुर्थी निमित्त रांजणगाव गणपती येथे श्री महागणपतींचे हजारो भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी - 
 अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त श्री क्षेत्र रांजणगाव गणपती, ता.शिरुर येथील महागणपतीच्या मंदिरात आकर्षक फुलांची सजावट, अथर्वशीर्ष पठण, महा अभिषेक महापुजा कऱण्यात आली. 
       या वर्षातील पहिलीच अंगारक संकष्टी चतुर्थी असल्याने दर्शनासाठी राज्यातील भाविकांनी अलोट गर्दी केली होती,गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया'च्या जयघोषात भाविकांनी महागणपतीचे मनोभावे दर्शन घेतले.
          भाविकांच्या अलोट गर्दीने रांजणगावला यात्रेचे स्वरुप आले होते.
          आज अंगारक संकष्टी चतुर्थी असल्याने पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करुन मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. तेव्हापासून दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली तर मंदिर प्रांगणात आयोजित सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात भाविकांसह महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. दुपारी १२ वाजता देवस्थान ट्रस्ट चे मुख्य विश्वस्त डॉ.ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानैवेद्य करण्यात आला.
             देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी सुलभ दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी तसेच सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे भाविकांसाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी दिली.
        अंगारकीनिमित्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने संपुर्ण मंदिराला फुलांची सजावट व येथील गणेशभक्त तथा प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. दत्तात्रय चव्हाण (रा.चंदननगर, पुणे) यांनी देवस्थान ट्रस्टला ५० हजार रुपये देणगी सुपूर्द केली.महागणपतीच्या चरणी भावेश कामदार या भाविकाकडून ५ कॅरेट केळी तर रांजणगाव सोसायटीचे उपाध्यक्ष विष्णू साळुंके यांच्या वतीने १००१ मोसंबीचा प्रसाद देण्यात आला. दुपारी येथील श्री महागणपती भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम झाला.
     यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ.ओमकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, उपाध्यक्ष संदिप दौंडकर, सचिव डॉ.तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव, राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर यांसह देवस्थान कर्मचारी व भाविक उपस्थित होते. 
  रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!