शिंडोडी ता.शिरूर बिबट्याची मादी कोंबडी खायला गेली अन खुराड्यात अडकली

9 Star News
0

शिरुर, प्रतिनिधी 
शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याची संख्या वाढत असुन अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे. शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात आज (दि 20) रोजी पहाटे चारच्या सुमारास एक बिबट्याची मादी मच्छिंद्र सोनवणे यांच्या घरापुढे असणाऱ्या कोंबड्याच्या खुराड्यात शिरली. परंतु बिबट्या खुराड्यात शिरल्यानंतर कोंबडी बाहेर पळाली अन शेतकऱ्याने खुराड्याच दार बंद केल्याने बिबट्याची मादी मात्र खुराड्यातच अडकली. 

शिरुरच्या पुर्व भागात घोड धरणाच्या कडेला असणाऱ्या निमोणे, गुनाट आणि शिंदोडी बागायती शेती असल्यामुळे परीसरात मोठया प्रमाणात ऊसाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे अनेकवेळा ऊसाच्या फडात बिबट्या लपून बसतो. परंतु शिकारीच्या शोधात बाहेर पडल्यानंतर अनेकवेळा शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होते. 

शिंदोडी येथील शेतकरी मछिंद्र सोनवणे यांच्या घरासमोर कोंबड्याच खुराड असुन आज (दि 20) पहाटे चारच्या सुमारास शिकारीच्या शोधात असलेली एक बिबटयाची मादी थेट कोंबड्याच्या खुराड्यात शिरली. त्यामुळे कोंबड्या आरडाओरडा करत खुराड्याच्या बाहेर पळाल्या. कोंबड्याच्या आवाजाने जागे झालेले शेतकरी मछिंद्र सोनवणे हे खुराड्याजवळ गेले असता त्यांना हि बिबटयाची मादी कोंबड्याच्या खुराड्यात शिरलेली दिसली. त्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखत खुराड्याच दार बाहेरुन बंद केलं आणि बिबटयाची मादी खुराड्यात अडकली. 

त्यानंतर सोनवणे यांनी हि गोष्ट शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक विठ्ठल दुर्गे यांच्या कानावर घातली. दुर्गे यांनी तातडीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क केला. त्यानंतर जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चंदन चवणे तसेच त्यांचे सहकारी आकाश डोळस, वैभव नेहरकर, शिवाजी मोघे, शिरुरचे वनपाल गणेश म्हेत्रे, वनरक्षक संतोष भुतेकर, वनकर्मचारी दिनेश गोरड, नवनाथ गांधले, संपत पाचुंदकर हे सर्वजण शिंदोडी येथे आले. 

यावेळी कोंबड्याच्या खुराड्यात अडकलेल्या बिबट्याच्या मादीला भुलीच इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आलं. त्यानंतर तिला जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात पाठविण्यात आले. अंदाजे दोन वर्षे वय असलेली हि बिबट्याचीं मादी असल्याचे यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!