शिरूर प्रतिनिधी
न्हावरे (ता.शिरूर) परिसरातील सोनवणे वस्ती येथे महादेव सोनवणे यांच्या घराशेजारील गोठ्या जवळ वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी( दि.28) पहाटे साडेतीन च्या सुमारास बिबट्या अखेर जेरबंद झाला.
त्याला माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात दाखल करण्यात येणार असल्याचे वनाधिकारी अमोल चव्हाण म्हणाले.
गेल्या दोन वर्षांपासून सोनवणे वस्तीवर बिबट्याने हैदास घातला होता. बिबट्या पिंजऱ्यात बंद झाल्याने परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
शुक्रवारी बिबट्याने महादेव सोनवणे यांच्या शेळया मेंढ्या च्या गोठ्यातून एका बोकडावर हल्ला करून बोकड ठार केला होता. बिबट्याच्या या हल्ल्याने वनविभागाने दखल घेऊन पिंजरा लावला व पिंजऱ्यात सावज म्हणून बोकड ठेवला होता. रात्री साडेतीन च्या दरम्यान अंधारात बिबट्या आपल्या सावजाकडे आला त्याच वेळी त्याचीच पिंजऱ्यात अखेर शिकार झाली. बिबट्याच्या आवाजाने महादेव सोनवणे व रविंद्र सोनवणे यांनी पाहीले असता अजून एक बिबट्या पिंजऱ्या च्या बाहेर उभा होता. दरम्यान सोनवणे यांनी आवाज केल्याने त्याने अंधारात धूम ठोकली. तर एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. चासकमान डाव्या कालव्या च्या पाण्यामुळे न्हावरे परिसरात आता ऊसाचे क्षेत्र चांगलेच वाढले आहे. त्यामुळेच बिबट्याला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सोनवणे वस्तीवरील महादेव सोनवणे व उत्तम सोनवणे यांच्या शेळया, मेंढ्या तसेच पाळीव कुत्री बिबट्याने ठार केली आहे. बिबट्याच्या दहशतीने या परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहे तरी वनविभागाने पुन्हा सोनवणे वस्ती परिसरात पिंजरा लावून राहिलेल्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रहार पतसंस्थेचे शिरूर तालूका अध्यक्ष दत्तात्रय तरटे व ग्रामस्थांनी केली आहे .
फोटो.
न्हावरे (ता.शिरूर) परिसरातील सोनवणे वस्ती येथे महादेव सोनवणे यांच्या घराशेजारील गोठ्याजवळ वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला