Loksabha election : जागांवरुन प्रमुख पक्षांमध्येच वाद वाढल्यामुळे यंदा मित्रपक्षांचं दबावतंत्र फारसं कामी न आल्याची चर्चा आहे. राजू शेट्टी यांना मविआचा पाठिंबा मिळण्याची आशा होती, पण ती सुद्धा आता मावळली. तर दुसरीकडे महायुतीत जानकरांना परभणीची जागा मिळाली आहे.
यंदा तिकीटाच्या शर्यतीत मोठ्या पक्षांमधल्याच स्पर्धेनं मित्रपक्षांचे प्रस्ताव मागे पडले आहेत. सुरुवातीला राजू शेट्टी स्वतंत्र लढण्याची चर्चा होती. नंतर ठाकरेंसोबत त्यांच्या भेटी झाल्या. आधी मविआनं शेट्टींना पाठिंबा दिल्याची बातमी आली. मात्र तुम्ही पाठिंबा द्या, पण आपण मविआत येणार नसल्याची भूमिका शेट्टींनी घेतली. नंतर ठाकरेंनी शेट्टींना मशाल चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिला. शेट्टींनी त्याला नकार दिल्यानं ठाकरेंनी सत्यजित पाटलांना हातकणंगलेमधून उमेदवारी दिली.
सदाभाऊ खोतही नरमले
दुसरीकडे महायुतीकडून हातकणंगलेत तिकीटाची मागणी करणारे सदाभाऊ खोतही नंतर नरमले. महादेव जानकरांनी शरद पवारांना भेटून पाठिंबा देण्याची विचारणा केली होती. मात्र अचानक त्यांनी महायुतीत असल्याचं सांगत परभणीतून अर्ज भरला. त्यामुळे गेल्या काही काळातल्या जानकरांच्याही भूमिकाही चर्चेत आल्या.
जानकरांना सुटलेल्या एका जागेवर जर आपणही शरद पवारांना भेटून दबावतंत्र आणलं असतं., तर कदाचित जागा सुटली असती. असा मिश्किल टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे.

