शिरूर ( प्रतिनिधी ) तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील उसाच्या शेतात दोन उदमांजरांची पिल्ले आढळून आली तर त्यात ठिकाणी सदर पिलांची आई मृत अवस्थेत आढळून आल्याने त्या अनाथ पिलांना प्राणीमित्रांनी ताब्यात घेऊन वनविभागाच्या माध्यमातून जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात दाखल केले आहे.
तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील धानोरे रोड लगत बाळासाहेब ढमढेरे यांच्या शेतात ऊसतोड सुरु असताना दोन बिबट्या सदृश प्राण्याची पिल्ले आढळून आल्याने खळबळ उडाली, दरम्यान शिरुर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप व वनपरिमंडळ अधिकारी गौरी हिंगणे, नियतक्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व शिरुर वनविभाग रेस्क्यू टीमचे शेरखान शेख यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता सदर पिल्ले रानमांजराची असल्याचे समोर आले मात्र काही वेळाने याच ठिकाणी रस्त्याचे कडेला अज्ञात वाहनाच्या धडकेने एक रानमांजर मादी मेलेली असल्याचे सर्पमित्र गणेश टिळेकर यांनी सांगितले, त्यामुळे सदर पिल्ले अनाथ झाल्याचे समोर आल्याने निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व शिरुर वनविभाग रेस्क्यू टीमचे शेरखान शेख, गणेश टिळेकर, शुभम वाघ, सोनाली चव्हाण, अमोल कुसाळकर, सुनील देंडगे, अर्शलान शेख यांनी सदर ठिकाणी धाव घेत त्या पिलांना ताब्यात घेतले त्यांनतर दोन्ही पिलांना शिरुर वनविभागाचे वाहन चालक अभिजित सातपुते यांच्या माध्यमातून पुढील कार्यवाही व पालन पोषण साठी जुन्नर येथील शासकीय बिबट निवारण केंद्र येथे दाखल करण्यात आले आहे.
फोटो खालील ओळ – तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथे आढळलेली रानमांजराची पिल्ले ताब्यात घेताना प्राणीमित्र.