महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आज मोठ्या हालचाली घडल्या आहेत. काँग्रेस नेते संजय निरुपम यांचं नाव स्टार प्रचारक यादीतून हटवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे संजय निरुपम यांच्यावर आता पक्षातून हकालपट्टी करण्याची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. याबाबत मुंबईत काँग्रेसच्या गोटात आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. काँग्रेसच्या राज्य प्रचार समितीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत संजय निरुपम यांच्यावर पक्षातून बडतर्फची कारवाई करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला.
हा प्रस्ताव दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावावर काँग्रेस हायकमांड काही निर्णय घेणार, त्याआधीच संजय निरुपम यांनी ट्विटरवर आपली भूमिका मांडली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. पण या मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण कीर्तिकरांच्या उमेदवारीला संजय निरुपम यांनी विरोध केला आहे. ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगेच संजय निरुपम यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांच्याकडून ठाकरे गटावर सडकून टीका करण्यात आली. अखेर याचमुळे पक्षाने त्यांचं नाव स्टार प्रचारक यादीतून काढून टाकलं. या कारवाईनंतर संजय निरुपम यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

