शिरूर प्रतिनिधी
३६, शिरूर लोकसभा मतदारसंघांतर्गत १९८- शिरूर विधानसभा मतदारसंघातील पहिले प्रशिक्षण दिनांक १५ व १६ एप्रिल रोजी शिरूर येथील विद्याधाम प्रशाला सभागृहात संपन्न झाले. यावेळी हे प्रशिक्षण मतदान केंद्रावर नियुक्त केलेले २२६७ निवडणूक अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी, सहाय्यक अधिकारी यांना देण्यात आले. या प्रशिक्षणात कंट्रोल युनिट ,बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट या मतदान यंत्राची माहिती व कार्य आणि इतर सर्व सामान्य माहिती देण्यात आली असल्याचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांनी सांगितले.
" शिरूर विधानसभा मतदारसंघात एकूण ४लाख ३६हजार ८७६ मतदारांनी नोंदणी केलेली आहे. यासाठी ४३९ मतदान केंद्रांची स्थापना केलेली आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ४३क्षेत्रीय अधिकारी नेमलेले असून मतदान १३ मे २०२४ रोजी निकोप आणि उत्साही वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने संपूर्ण नियोजन केले आहे."
*संगीता राजापूरकर*
सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, शिरूर
एकूण ५ सत्रात संपन्न झालेल्या या प्रशिक्षणात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदल्या दिवशी व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी करावयाची कामे, कर्तव्य आणि अधिकार याबाबत माहिती दिली. मतदान प्रक्रियेत चुका होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे सर्वांनी पालन करावे असे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले.
मॉक पोल, मतदान केंद्राची रचना, टपाली मतदान, प्रदत्त मतदान, संविधानिक व संविधानिक बाबी, मतांच्या गोपनेता बाबत उमेदवार व प्रतिनिधींना जाणीव करून देणे, केंद्राध्यक्ष डायरी अद्यावत ठेवणे, मतदान केंद्रावरील सुरक्षा, मतदानाची वेळ संपल्यावर करावयाची कार्यवाही, मतदान अधिकाऱ्यांची कामे व कर्तव्य आणि मतदान यंत्र हाताळण्याचे प्रात्यक्षिक या सर्व बाबींवर सविस्तर प्रशिक्षण तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, मास्टर ट्रेनर राम जगताप आणि मारुती कदम यांच्या साह्याने देण्यात आल्याची माहिती सहा. निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांनी दिली.
निवडणूक प्रक्रियेला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घाबरून न जाता संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास करावा. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेच्या वेळेस चुका होणार नाहीत यासाठी शंकांचे सादरीकरणाच्या माध्यमातून निरसन करण्यात आल्याची माहिती संगीता राजापूरकर यांनी दिली.