शिरुरमध्ये साहेब असल्याचे सांगून महिलेचे सव्वा तोळे दागिने लांबवले
शिरूर
( प्रतिनिधी ) शिरूर येथील बस स्थानकामध्ये आलेल्या महिलेला मी साहेब आहे असे भासवून ज्येष्ठ महिलेला बाजूला घेऊन जात महिलेच्या गळ्यातील सव्वा तोळे वजनाचे दागिने लंपास केल्याची घटना घडली असल्याने शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर शहरातील बस स्थानक येथे सोनाबाई माने ही सत्तर वर्षीय जेष्ठ महिला बस स्थानकात उभी असताना एक व्यक्ती महिलेजवळ आला, त्याने महिलेला तुमचे नाव काय, गाव काय असे विचारपूस केली त्यावेळी महिलेने तुम्ही कोण असे विचारले असता मी आरणगावचा साहेब आहे, तेथेच राहतो असे भासवून महिलेला बस स्थानकाशेजारी विसावा होटेल जवळ घेऊन गेला, दरम्यान सदर इसमाने महिलेचा विश्वास संपादन करत महिलेच्या गळ्यातील सव्वा तोळे वजनाचे दागिने काढून घेत सदर इसम फरार झाला, घडलेल्या प्रकाराबाबत सोनाबाई तुकाराम माने वय ७० वर्षे रा. कोतुळ ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार शरद वारे हे करत आहे.

