शिरूर नाना स्पॉट धाब्याजवळ मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात...शिरूर बायपास परिसरातील कारवाई १ लाख ३८ हजाराचे 'एमडी' जप्त
शिरूर (प्रतिनिधी)
पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिरूर परिसरात बाह्य मार्गावरील नाना स्पॉट धाब्याजवळ एम. डी. या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका अल्पवयीन(विधिसंघर्षित )बालकाला ताब्यात घेतले असून ,त्याच्याकडून ६.९४ ग्रॅम वजनाचा एम डी किंमत १ लाख ३८ हजार ८०० रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
शिरूर शहरात चार दिवसात एमडी विक्री करणारे दोन गुन्हे दाखल झाल्याने शिरूर परिसरात याचे मोठे जाळे असल्याचे दिसून येत असून, पोलीसही ॲक्शन मोडवर असले तरी याचा प्रमुख आका कोण? हे शोधणे महत्त्वाचे आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दि. ११ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे शिरूर उपविभागातील पथक शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे नियंत्रण व अमली पदार्थ विरोधी मोहीम राबवत होते. यावेळी पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिरूर बायपास येथील बंद पडलेल्या 'नाना स्पॉट' हॉटेलजवळ एक जण मेफेड्रोन(एम डी)विक्री करण्यासाठी येणार आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ वरिष्ठांना या माहितीची कल्पना दिली. त्यांच्या सूचनेनुसार शिरूर पोलिसांच्या मदतीने सदर ठिकाणी सापळा रचण्यात आला सं संशयित परिसरात येताच पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ६.९४ ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन हा अमली पदार्थ आढळून आला. त्याची इतर माहिती घेतली असता तो अल्पवयीन असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी अमली पदार्थासह इतर मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) ऍक्ट कलम ८(क), २१(ब) सह बीएनएस (BNS) कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून,ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, संजू जाधव, अक्षय कळमकर पोलीस अंमलदार नीरज पिसाळ यांच्या पथकाने केली.

