शिरूर नगर परिषद शाळेच्या शिस्तप्रिय शिक्षिका करळे बाईंच्या आठवणी
शिरूर प्रतिनिधी मुकूंद ढोबळे
आज सकाळी व्हॉट्सॲपवर एक धक्कादायक बातमी आली शिरूर नगरपरिषद प्राथमिक शाळेच्या माजी आदरणीय शिक्षिका श्रीमती सुमनताई बाळासाहेब करळे यांचे ८५ व्या वर्षी निधन झाले. ही बातमी वाचून काही क्षण स्तब्धता आली, आणि डोळ्यासमोर १९७५-९५ चा तो काळ जसाच्या तसा फिरून गेला...
करळे बाई तर कुणी त्यांना प्रेमाने माहेरच्या नावाने घाडगे बाई म्हणायचं, तर कुणी करळे मॅडम म्हणून ओळखायचं. एक नेहमी हसतमुख व्यक्तिमत्व परंतु त्यांच्या शिकवणुकीच्या पद्धती, शिस्त, प्रेम, आणि मायेचा स्पर्श अजूनही हजारो विद्यार्थ्यांच्या आठवणीत तसाच कोरलेला आहे.
त्या काळात शिक्षक म्हणजे केवळ अभ्यास घेणारे नव्हते ते आदर्श घडवणारे, माणूस घडवणारे, आणि मनात खोलवर आदर निर्माण करणारे असायचे. करळे बाई त्याच वर्गातील एक होत्या. त्या वर्गात यायच्या, आणि साऱ्या मुलांचे लक्ष क्षणात एकवटायचे. त्यांची शिकवण्याची पद्धत कधी शिस्तबद्ध, तर कधी आईसारखी माया देणारी होती. अभ्यास न झाल्यास छडी मारायच्या, पण तितक्याच प्रेमाने डोक्यावरून हात फिरवायच्या. त्या छडीमागे राग नव्हता, तर घडवण्याची जिद्द होती.
आज त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर जणू शिरूरच्या शिक्षण क्षेत्राने एक आधारवड गमावला आहे. नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेतील शाळा क्रमांक एक चे विद्यार्थी, विशेषतः १९७५ ते ९५ या काळातील, सगळे आज त्यांच्या आठवणीत हरवले असतील.
त्याकाळातील जोशी गुरुजी, नेवासकर गुरुजी, पवार गुरुजी, साबळे गुरुजी, शिंदे गुरुजी, अत्रे बाई, सरपोतदार बाई, दाभाडे बाई, लंके बाई, मुळे बाई,निंबाळकर गुरुजी,काळे गुरुजी… या सर्वांसोबत करळे बाई हे नाव कायम आमच्या मनात आदराने घेतलं जातं.
त्या काळातील शिक्षक केवळ शिक्षक नव्हते, ते आमचे दुसरे आई वडील होते, शिस्त, संस्कार, आणि जीवनमूल्य देणारे गुरु होते. करळे बाई त्या सगळ्यांचे मूर्तिमंत उदाहरण होत्या.
आज त्यांच्या जाण्याने एक काळ संपला असं वाटतंय. पण त्यांची शिकवण, त्यांचे बोल, त्यांच्या छडीचे चटके आणि मायाळू स्पर्श हे सगळं आमच्या मनात कायम राहील.
करळे बाई, आपण आम्हाला फक्त शिक्षणाबरोबर जगायला शिकवलं. आपला शिस्तीचा आणि प्रेमाचा वारसा आम्ही कायम आठवत राहू.
तर त्यांचे चिरंजीव सुनिल करळे हे शिरूर नगरपरिषदेत अकाउंटंट म्हणून होते.तेही नुकतेच निवृत्त झाले आहे. त्यांच्यामागे मुलगा सून, नातवंडे असा परिवार आहे.
बाईंना भावपूर्ण श्रद्धांजली....