शिरूर शहरालगत जोशीवाडी पाचर्णेमळा बाबूराव नगर पांजरपोळ परिसरात बिबट्याचा वावर वाढला सावधान !
शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर शहरालगत असणाऱ्या पाचर्णे मळा (जोशीवाडी)वस्तीच्या ठिकाणी नदीकिनारी असणाऱ्या शेती परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला असून या भागात त्वरित बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी नागरिक व शेतकरी वर्गातून होत आहे.
शिरूर शहरातील पाचर्णे मळा हे उपनगर असून त्याठिकाणी सध्या मोठी लोकवस्ती आहे. तर जोडून जोशीवाडी महादेव नगर, व शिरूर शहर तसेच नदीपालीकडे श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी हे गाव असून यागावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
त्यामुळे या परिसरात काल सायंकाळी आजीज अशरफ खान हे शेतीला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना काही अंतरावर बिबट्या हा दिसला व तो तेथील चिंचेच्या झाडावर चढला हे पाहताच भयभीत होऊन त्यांनी त्याठिकाणहून पळ काढून जवळच असणाऱ्या लोकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर काही लोक चिंचेचे झाडाजवळून पहात असताना पुन्हा आवाजाने बिबट्याने झाडावरून उडी मारून उसाच्या शेतात पळून गेला आहे. तर याअगोदर ही आबा तळेकर या कामगाराने ही बिबट्या याच परिसरात फिरताना पाहिला आहे.
याबाबत पत्रकार फैजल पठाण यांनी शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांना माहिती दिली असून याभागाची पाहणी करून या भागात पिंजरा लावण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
पाचर्णे मळा हा भाग शिरूर शहराचा एक भाग आहे. येथून शिरूर शहराची लोक वस्ती सुरू होत असून या भागातून मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळेस नागरिक व दिवसा विद्यार्थी विद्यार्थिनी ये जा करत असतात तर सायंकाळी व पहाटे या भागात मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्ध नागरिकांची मोठी संख्या आहे. त्यामुळे या भागात बिबट्या आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लवकरच या भागात वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी करण्यात आली आहे.
अभिजित पाचर्णे, माजी नगरसेवक शिरूर