शिरूर, प्रतिनिधी
संपूर्ण पुणे जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथील तिहेरी जळीत हत्याकांडामधील महिलेची व मुलांची ओळख अद्याप पटली नसून, यामुळे तिहेरी हत्याकांडाचा तपास करणे पोलिसांपुढे मोठे आव्हान ठरणार आहे. तपासासाठी दहा पोलिस पथके या तिहेरी हत्याकांडाचा चोहबाजूने तपास करीत असल्याचे रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.
या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण पुणेग्रामीण पोलीस निरीक्षक अशोक शिळीमकर, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चिवडशेट्टी, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तीनही पोलीस स्टेशन व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक या गुन्ह्याचा तपास करत आहे.
काल दिनांक 25 मे रोजी सकाळी साडे अकरा दरम्यान रांजणगाव गणपती ता. शिरूर हद्दीतील ग्रोवेल कंपनीच्या मागे अंदाजे पंचवीस वर्ष वय असणारी महिला व तिच्याबरोबर एक चार वर्षाचा व एक दीड वर्षाचा मुलांची मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडले आहे. या तिघांच्या डोक्यात जबर मारहाण करून त्यांचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आले असल्याची प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
याबाबत गुलाब भिवराज येळे (55 वर्ष ) सहाय्यक फौजदार रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे.
रांजणगाव पोलीस स्टेशन येथे खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेच्या उजवे हाताचे मनगटावर बदाम चिन्ह व त्यापुढे mom Dad इंग्रजीत गोंदलेले, पाठीमागील बाजूस बदामामध्ये, R व S व त्यापुढे Rajratan व जय भीम असे गोधन.डावे हातावर फुलांची डिझाईन आहे.
घटनास्थळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलीस ठाण्याचे महादेव वाघमोडे पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्टाफ तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व स्टाफ यांनी घटनास्थळी भेट दिली असून,त्याचप्रमाणे गुन्ह्याचे घटनास्थळी फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट यांनी भेट दिलेली आहे.
मयत महिला व मुलांची ओळख पटवून आरोपी शोध करता वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत. या तिहेरी खुनाबाबत आरोपींनी कुठलाही पुरावा सध्यस्थितीत नसल्याने पोलिस चोहोबाजूंनी गतीने तपास करीत आहे.
Lcb, स्थानिक तसेच शिरूर डिव्हिजन मधील पोलीस स्टेशन चे वेगवेगळ्या टीम तयार करून मयत यांची ओळख पटविणे व गुन्हा उघडकीस आणनेसाठी टास्क दिले असून तपास सुरू आहे.
महादेव वाघमोडे,पोलिस निरीक्षक, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन.