शिरूर येथे 9 जून रोजी महसूल लोक अदालत; प्रलंबित दावे तडजोडीने निकाली काढण्याची संधी
शिरूर प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. महसूल विभागामार्फत दिनांक 9 जून 2025 रोजी महसूल लोक अदालत आयोजित करण्यात येत आहे. ही लोक अदालत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि मंडळ अधिकारी पातळीवरील प्रलंबित महसूल खटल्यांचे तडजोडीने निवारण करण्यासाठी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिली आहे.
महसूल विभागात रस्ता, अतिक्रमण, फेरफार, आरटीएस व अन्य प्रकारच्या प्रकरणांचे मोठ्या प्रमाणावर खटले प्रलंबित असतात. त्यामुळे नागरिकांना निवाड्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागते. ही समस्या सोडवण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 अंतर्गत लोक अदालत ही एक प्रभावी पर्यायी विवाद निवारण यंत्रणा म्हणून उभारण्यात आली आहे. या माध्यमातून दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने प्रकरणे तडजोडीने निकाली काढता येतात.
लोक अदालतसाठी अर्ज करण्यासाठी दिनांक 21 मे 2025 ते 30 मे 2025 या कालावधीत संबंधित स्तरावर (तलाठी सजा, मंडळ अधिकारी, तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी) 'नमुना अ' या अर्जाद्वारे अर्ज करता येईल. अर्जाचे नमुने संबंधित कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
प्राप्त अर्जांनुसार पूर्वतयारी बैठक 02 जून 2025 रोजी होणार आहे. तर प्रत्यक्ष महसूल लोक अदालत दिनांक 9 जून 2025 रोजी पुढील ठिकाणी घेण्यात येणार आहे:
मंडळ अधिकारी स्तरावरील खटले – संबंधित मंडळ अधिकारी कार्यालयात
तहसील स्तरावरील फेरफार खटले – फेरफार अदालत, सभागृह क्रमांक 1, तिसरा मजला, तहसील कार्यालय, शिरूर
प्रांत अधिकारी स्तरावरील खटले – उपविभागीय अधिकारी, पुणे (जुनी जिल्हा परिषद, तिसरा मजला, पुणे)
या उपक्रमाबाबत शिरूर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे आणि आपल्या प्रलंबित प्रकरणांचे सामोपचाराने निवारण करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब म्हस्के केले आहे.